कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या दक्षिण मुंबईतील प्रॉपर्टीचा होणार लिलाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 02:42 PM2017-10-18T14:42:01+5:302017-10-18T14:43:26+5:30
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जप्त केलेल्या मालमत्तांपैकी 3 प्रॉपर्टीचा लिलाव होणार आहे. 14 नोव्हेंबरला होणाऱ्या लिलावसाठी जाहिरातही देण्यात आली आहे.
मुंबई - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जप्त केलेल्या मालमत्तांपैकी 3 प्रॉपर्टीचा लिलाव होणार आहे. 14 नोव्हेंबरला होणाऱ्या लिलावसाठी जाहिरातही देण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील पाकमोडिया इस्टेट येथील फ्लॅट, हॉटेल अफरोज आणि याकूब स्ट्रीट येथील शबनम गेस्ट हाऊसचा लिलाव होणार आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2015 मध्ये झाला लिलाव झाला होता. पण बोली जिंकलेले जेष्ठ पत्रकार बालाकृष्णन मुदत पूर्ण होण्याच्या आत पूर्ण रक्कम भरू शकले नाहीत.
डी-कंपनीच्या बेनामी मालमत्तेवर ‘ईडी’ची नजर
दरम्यान, गेल्या महिन्यात ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. जवळपास तीन आठवड्यांच्या तपासामध्ये पोलिसांनी या प्रकरणी एकूण चार आरोपींना अटक केली.यामध्ये छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगरचाही समावेश आहे. कासकरविरुद्ध आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले आहेत. एका प्रकरणात कासकरच्या टोळीने सराफा व्यावसायिकाकडून ५० लाखांचे दागिने खंडणी स्वरूपात घेतले. याशिवाय, गोराई येथील जवळपास २५० कोटी रुपयांच्या जागेच्या वादातही त्याने मोठी खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात थेट दाऊद इब्राहिमचे नाव समोर आल्यानंतर ईडीनेही हालचाली सुरू केल्या.
डी-कंपनीच्या बेनामी मालमत्तेची माहिती सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) गोळा केली जात आहे. त्यासाठी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये इक्बाल कासकरची चौकशी करत असलेल्या खंडणीविरोधी पथकाशी ‘ईडी’ने संपर्क साधला आहे. खंडणीच्या पैशांतून डी-कंपनीने जमवलेल्या मालमत्तेचा तपशील गोळा करण्यास सक्तवसुली संचालनालयाने सुरुवात केली आहे. त्यासाठी ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाचीही मदत घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कासकरच्या चौकशीदरम्यान खंडणीविरोधी पथकाने त्याच्याकडून मालमत्तेचाही तपशील काढण्याचा प्रयत्न केला. कासकरचे एकाही बँकेत खाते नसल्याचे चौकशीदरम्यान स्पष्ट झाले. अवैध मार्गाने जमवलेला पैसा कुणी सहसा बँकेत ठेवतच नाही. त्यामुळे पोलिसांनीही त्याच्या या जबाबावर विश्वास ठेवला. मात्र, दाऊद इब्राहिम किंवा त्याच्या भावांनी नातलगांच्या नावे मालमत्ता घेतली असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्यांचे हस्तक आणि नातेवाइकांचेही आर्थिक व्यवहार तसेच मालमत्तांचा तपशील सक्तवसुली संचालनालय आणि इतर यंत्रणा घेत आहेत. छोटा शकीलच्या माध्यमातून डी-कंपनीला आर्थिक रसद पुरवणारा मटकाकिंग पंकज गंगर हा या टोळीचा एकमेव फायनान्सर नाही. गंगरसारखे आणखी किती फायनान्सर अर्थपुरवठा करून डी-कंपनीला बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत, याचीही चौकशी केली जात आहे.