कुख्यात गँगस्टर छोटा राजन याला दोन वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:14 AM2021-01-08T04:14:06+5:302021-01-08T04:14:06+5:30
खंडणी प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पनवेलमधील बांधकाम व्यावसायिकाकडे २६ कोटी रुपयांची खंडणी मगितल्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने कुख्यात ...
खंडणी प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पनवेलमधील बांधकाम व्यावसायिकाकडे २६ कोटी रुपयांची खंडणी मगितल्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने कुख्यात गँगस्टर छोटा राजन याला दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. राजनसह सुमित म्हात्रे, लक्ष्मण निकम उर्फ दाद्या आणि सुरेश शिंदे यांनाही दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली.
पनवेल बांधकाम व्यावसायिक नंदू वाजेकर यांना धमकी दिल्याप्रकरणी व त्यांच्याकडून २६ कोटी रुपयांची खंडणी मगितल्याप्रकरणी छोटा राजनवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नंदू वाजेकर यांनी २०१५ मध्ये पुण्यात एक जमीन खरेदी केली. यासाठी परमानंद ठक्कर या मध्यस्थाला दोन कोटी रुपयांचे कमिशन द्यायचे होते. मात्र, ठक्कर याने जास्त पैशांची मागणी केली. त्याची मागणी मान्य करण्यास वाजेकर यांनी नकार दिला. त्यानंतर ठक्कर याने छोटा राजनशी संपर्क केला. छोटा राजनचे काही गुंड वाजेकर यांच्या कार्यालयात आले आणि २६ कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. खुद्द छोटा राजननेही त्याला दोन वेळा धमकीचा फोन केला. मुंबईतले हे तिसरे प्रकरण आहे, ज्यात राजनला शिक्षा झाली आहे. याशिवाय दिल्लीतील बनावट पासपोर्ट प्रकरणीही छोटा राजनला शिक्षा झाली आहे.