आता औद्योगिक, व्यावसायिक ग्राहकांना १० टक्के वीजबिल, बंद आस्थापनांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 07:15 AM2020-05-10T07:15:39+5:302020-05-10T07:16:26+5:30
थकबाकीवरील व्याज आणि स्थगिती कालावधीनंतरच्या वसुलीबाबत वितरण कंपन्यांमध्ये एकवाक्यता नव्हती. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुंबई : लॉकडाउनमुळे वीज वापर बंद असला तरी औद्योगिक आणि व्यावसायिक वीज ग्राहकांना भरमसाठ बिले पाठविली जात असल्याने अस्वस्थता पसरली आहे. मात्र, या ग्राहकांना टोकन म्हणून सरासरी वीज वापराच्या केवळ १० टक्के बिल द्यावे असे आदेश शनिवारी राज्य वीज नियमाक आयोगाने (एमईआरसी) दिले. त्यामुळे या वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
लॉकडाउनच्या काळात विजेच्या मीटरचे रिडिंग घेऊन बिल पाठविणे शक्य नसल्याने एएमआरच्या आधारे किंवा सरासरी बिल पाठविण्याचे निर्देश एमईआरसीने २६ मार्चच्या आदेशान्वये दिले होते. त्यानंतर ३० मार्चला औद्योगिक, व्यावसायिक ग्राहकांसाठी तीन महिन्यांची बिलांना तात्पुरती स्थगिती देत असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतरही वीज पुरवठा करणाऱ्या विशेषत: मुंबईतील कंपन्यांना त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत संदिग्धता होती.
थकबाकीवरील व्याज आणि स्थगिती कालावधीनंतरच्या वसुलीबाबत वितरण कंपन्यांमध्ये एकवाक्यता नव्हती. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच, तसेच, वापर नसतानाही सरासरीनुसार बिल आकारणी होत असल्याने ग्राहकांमध्ये अस्वस्थता होता. तो गोंधळ शनिवारी आयोगाने दूर केला.
या वीज ग्राहकांच्या मीटरचे प्रत्यक्ष रिडींग जेव्हा उपलब्ध होईल त्यावेळी त्या बिलानुसार रकमेचे समायोजन करावे. लॉकडाउनच्या काळातील वीज बिलांची रक्कम भरताना त्यावर थकबाकी शुल्क किंवा व्याज आकारणी करू नये. तीन महिन्यानंतर बिल भरणा सुरू झाल्यानंतर पुढील तीन महिने तीन टप्प्यात बिल भरण्यासाठी मुभा या ग्राहकांना द्यावी. तसेच, एकरकमी भरणा केल्यास एक टक्का सवलतही द्यावी असे स्पष्टीकरणही आयोगाने दिले आहे. वीज वितरण कंपन्यांना यापेक्षा जास्त सवलत द्यायची असेल तर ती मुभाही आयोगाने दिली आहे.