आता देशातील १०९ मार्गांवर धावणार १५१ खासगी ट्रेन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 08:37 AM2020-07-03T08:37:06+5:302020-07-03T08:37:12+5:30
बहुतांश आधुनिक ट्रेन्स मेक इन इंडियाअंतर्गत भारतात तयार केल्या जातील, असेही रेल्वेनं म्हटले आहे.
मुंबई - रेल्वे मंत्रालयानं १०९ मार्गांवर १५१ आधुनिक ट्रेनद्वारे प्रवासी गाड्या चालविण्यासाठी खासगी कंपन्यांकडे अर्ज मागिवला आहे. खासगी क्षेत्रातून सुमारे ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे रेल्वे प्रशासनानं म्हटले आहे. केंद्र सरकारनं खासगी कंपन्यांना भारतीय रेल्वे नेटवर्कवर प्रवासी ट्रेन चालविण्याची परवानगी दिली आहे. खासगी युनिटला आपल्या नेटवर्कवर प्रवासी गाड्या चालविण्याची योजना रेल्वेनं बुधवारी औपचारिकरित्या सुरू केली. त्यानुसार भारतीय रेल्वेच्या १०९ मार्गांवर १५१ खासगी ट्रेन धावणार असून, प्रत्येक ट्रेनला किमान १६ डबे असतील. या मार्गांवर धावणाऱ्या सर्व गाड्यांचा वेग प्रतिताशी १६० किमी असेल. यापैकी बहुतांश आधुनिक ट्रेन्स मेक इन इंडियाअंतर्गत भारतात तयार केल्या जातील, असेही रेल्वेनं म्हटले आहे.
रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन यांच्या वतीनं देशातील पहिली खासगी ट्रेन लखनऊ ते दिल्ली तेजस एक्स्प्रेस धावली. त्यानंतर देशभरात खासगी ट्रेन सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि आयआरसीटीसीनं वेग धरला. रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, कमी खर्चात देखभाल करणे, भारतीय रेल्वेमध्ये कमी कालावधीसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि नोकरीच्या संधीमध्ये वाढ करणे, उत्तम सुरक्षा आणि जागतिक स्तरावरील प्रवासाचा अनुभव घेणे हे या खासगीकरणामागील उद्दिष्ट आहेत. रेल्वेची आर्थिक व्यवस्था, अधिग्रहण, ऑपरेशन आणि देखभाल याची जबाबदारी खासगी कंपन्यांचीच असणार आहे.
चालक आणि गार्ड भारतीय रेल्वेचेच
खासगी कंपन्यांना हा प्रकल्प ३५ वर्षांसाठी देणार असल्याचे रेल्वेनं म्हटले आहे. यासाठी एका खासगी कंपनीला पारदर्शक निविदा प्रक्रियेद्वारे निश्चित शुल्क, वापरावरील ऊर्जा शुल्क आणि निश्चित महसूल यापैकी एक हिस्सा भारतीय रेल्वेला द्यावा लागेल. या सर्व ट्रेन्समध्ये चालक आणि गार्ड हे भारतीय रेल्वेचे असतील, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.