मुंबईतील ‘जे.जे.’ मध्ये आता 24 तास एमआरआय सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 08:34 AM2023-07-18T08:34:39+5:302023-07-18T08:35:05+5:30

रेडिऑलॉजी विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय; १ ऑगस्टपासून सुरुवात

Now 24 hours MRI service at 'JJ' in Mumbai | मुंबईतील ‘जे.जे.’ मध्ये आता 24 तास एमआरआय सेवा

मुंबईतील ‘जे.जे.’ मध्ये आता 24 तास एमआरआय सेवा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : सरकारी आणि महापालिकेच्या रुग्णालयात अचूक निदान करण्यासाठी डॉक्टरांनी सुचविलेली एमआरआय चाचणी करण्यासाठी दोन ते तीन महिन्यांची वाट पाहावी लागते. मात्र, जे. जे. रुग्णालयाच्या रेडिऑलॉजी विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन आता १ ऑगस्टपासून दिवसरात्र एमआरआय करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी रात्री फक्त इमर्जन्सी लागणाऱ्या रुग्णांचीच ही चाचणी केली जायची. मात्र, आता कुणी नियमित एमआरआय हवा असणारा  रुग्ण रात्री आला तरी त्याला ही सुविधा मिळणार आहे. त्यामुळे रुग्णांची प्रतीक्षा यादी कमी होणार आहे.

वैद्यकीय विश्वातील प्रगतीमुळे आजाराचे अचूक निदान करणे शक्य झाले आहे. त्यासाठी अत्याधुनिक चाचण्यांचा वापर केला जातो. त्यात सीटी स्कॅन आणि एमआरआय या महत्त्वपूर्ण चाचण्यांचा समावेश आहे. विविध आजाराच्या निदानासाठी ही चाचणी करण्यासाठी डॉक्टरांकडून सांगितली जाते. मात्र,  नियमित वेळेत ही चाचणी करून घेण्यासाठी मोठी प्रतीक्षा यादी असते. कारण रुग्णांची संख्या अधिक असते आणि एकच मशीनवर हा भार येत असतो. त्यामुळे प्रतीक्षा यादीची वेळ कमी करण्यासाठी जे जे रुग्णालयाने रात्रभर एमआरआयची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारी रुग्णालयात या चाचण्या स्वस्त 
सरकारी रुग्णालयात सी टी स्कॅन ४०० ते १२०० रुपयांत होतो, तर खासगी रुग्णालयात किंवा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये याकरिता ३००० ते ४००० रुपये मोजावे लागतात. 
एमआरआयसाठी सरकारी रुग्णालयात २२०० - ३००० खर्च येतो तर खासगी रुग्णालयात यासाठी ८००० ते १०,००० रुपये इतका खर्च येतो. नायर रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन बंद असल्याने त्याचा भार जेजेवर पडत होता. 

एसएमएसवर वेळ देणार

अनेक रुग्णांनी एमआरआय चाचणीसाठी नोंदणी केल्यानंतर त्याची तीव्रता बघून त्यांना त्यांच्या मोबाईलवर वेळ आणि दिनांक जाईल त्यावेळी त्यांनी एमआरआय किंवा सीटी स्कॅनची वेळ देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचाही वेळ वाचेल आणि उगाच रुग्णालयात अधिक वेळ काढावा लागणार नाही. यासाठी विशेष सॉफ्टवेअर बनविण्याचे काम सुरू आहे. 

ही सेवा १ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार असून, त्याकरिता टेक्निशियन आणि डॉक्टर कशा पद्धतीने या कामासाठी आखता येईल, याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रतीक्षा यादी कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. कारण या चाचण्याशिवाय त्याच्या आजाराचे निदान होणे अवघड होऊन बसते. आमचे सर्व सहकारी रुग्णाच्या चाचण्या कशा लवकर करता येतील, त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
- डॉ. अविनाश गुट्टे, प्राध्यापक, रेडिओलॉजी विभागप्रमुख, सर जे.जे. रुग्णालय

Web Title: Now 24 hours MRI service at 'JJ' in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.