मुंबई : मागील काही महिन्यांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे वाहतूक खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी, जीवनावश्यक वस्तूंचे दरदेखील वाढले आहेत. इंधनाच्या दरवाढीमुळे आता खासगी प्रवासी वाहन चालवणाऱ्यांनीदेखील आपल्या प्रती किलोमीटर मागे असणाऱ्या भाड्यामध्ये वाढ केली आहे. यामुळे विशेष वाहन करून प्रवास करणाऱ्यांना या महागाईचा फटका बसत आहे. आधी ८ ते १० रुपये प्रति किलोमीटर दर आकारणाऱ्या वाहनचालकांनी आता १२ ते १५ रुपये प्रति किलोमीटर भाडे आकारण्यास सुरुवात केली आहे.
कोरोनामुळे खासगी प्रवासी वाहनचालक मोठ्या अडचणीत सापडले होते. अनेकांना आपल्या वाहनाचे हप्ते भरता आले नाहीत तर काहींनी आपली वाहने याकाळात विकली. आता निर्बंध शिथिल केल्याने आम्हाला पोटापाण्यासाठी कमवू द्या, असे या वाहनचालकांचे म्हणणे आहे.
असे वाढले पेट्रोल, डिझेलचे दर
पेट्रोल. डिझेल
जानेवारी २०१९ ७४. ६६
जानेवारी २०२० ८०. ७१
जानेवारी २०२१ ९२.८६. ८३.३०
ऑगस्ट २०२१ १०७.८३ ९७.४५
प्रवासी वाहनांचे प्रति किलोमीटर दर
वाहनाचा प्रकार प्रति किमी दर
अ) हॅचबॅक.१०
ब) सेमीसिडान. १५
क) एसयूव्ही.१८
ड) सिडान.२४
गाडीचा हप्ता कसा भरणार
दीपक जाधव (वाहनचालक) - कोरोनामुळे गाडी सलग दीड वर्षे उभी होती. यामुळे कोणतीच कमाई झाली नाही. लॉकडाऊन उघडल्यानंतर गाडी दुरुस्त करून ती रस्त्यावर येईपर्यंत खर्चाला सामोरे जावे लागले. त्यात आता इंधनाचे दर वाढल्यामुळे नाइलाजाने दर वाढवावे लागत आहेत.
अजय सिंग (वाहनचालक) - कोरोनाच्या भीतीने अजूनही काही नागरिक घराबाहेर निघत नाहीत. त्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. गाडी दिवसाला शंभर किलोमीटर धावणेदेखील अवघड झाले आहे. त्यामुळे आता हप्त्याचे पैसे तरी सुटावे, या उद्देशाने दरांमध्ये किंचित वाढ केली आहे.
स्टार १०५५