Join us

मुंबईत घरगुती शौचालय बांधण्यासाठी आता १६ हजारांचे अनुदान, कोण करु शकतं अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 13:17 IST

मुंबईतील अस्वच्छता दूर करण्याच्या दृष्टीने आता मुंबई महापालिकेने घरोघरी शौचालय उभारणीसाठी वैयक्तिक ११,००० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई

मुंबईतील अस्वच्छता दूर करण्याच्या दृष्टीने आता मुंबई महापालिकेने घरोघरी शौचालय उभारणीसाठी वैयक्तिक ११,००० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी घरगुती शौचालयासाठी केंद्र शासनाचे ४ हजार आणि राज्य शासनाचे १ हजार रुपायांबरोबर महापालिकेकडून २ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत होते. आता ही रक्कम वाढवल्याने लाभार्थ्याला एकूण १६ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. 

केंद्र शासनाद्वारे देशातील सर्व शहरात ऑक्टोबर २०२४ पासून स्वच्छ भारत अभियान १.० हे राबवले जात आहे. महापालिकेद्वारे २०२५ पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामध्ये वैयक्तिक घरगुती शौचालय घटकांतर्गत घराभोवती ५०० मीटर परिघामध्ये सामुदायिक शौचालय नसलेले अर्जदार घरगुती शौचालयासाठी अनुदानास पात्र ठरत होते. 

५०० मीटर परिघात सामुदायिक शौचालय नसण्याची अट आता वगळल्याने स्वच्छता अभियानाला वेग येण्याचे संकेत आहेत. 

हागणदारीमुक्त शहर१. झोपडपट्टी तथा चाळींमध्ये सामूहिक शौचालय उपलब्ध असल्याने तेथील अर्जदारांना या अनुदानाचा लाभ मिळत नव्हता. त्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये स्वच्छ भारत अभियान २.० अभियानांतर्गत हागणदारीमुक्त शहर अभियान अधिक तीव्र करण्यात आले. 

२. यामध्ये नवीन स्वतंत्र कुटुंबे, स्थलांतरित कुटुंबे, सामुदायिक शौचालयांचा वापर करणारी कुटुंबे व अस्वच्छ शौचालये असणारे लाभार्थी, अधिकृत तथा अनधिकृत वसाहती, झोपडपट्टीमध्ये राहत असलेल्यांनादेखील ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 

३. फक्त पूर्वी स्वच्छ भारत अभियानात लाभ घेतलेले अर्जदार या अभियानात पात्र ठरणार नाहीत. यापूर्वीची ५०० मीटर परिघात सामुदायिक शौचालय नसण्याची अट आता नव्याने योजनेमध्ये वगळण्यात आली आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई