कोरोनावर आता नवीन टास्क फोर्स, डॉ. सुभाष साळुंखे अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 08:06 AM2023-04-23T08:06:41+5:302023-04-23T08:07:05+5:30

आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांची सदस्यपदी बोळवण

Now a new task force on Corona, Dr. Subhash Salunkhe President | कोरोनावर आता नवीन टास्क फोर्स, डॉ. सुभाष साळुंखे अध्यक्ष

कोरोनावर आता नवीन टास्क फोर्स, डॉ. सुभाष साळुंखे अध्यक्ष

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत असताना, सार्वजनिक आरोग्य विभागाने आधीचा टास्क फोर्स रद्द करून नवीन टास्क फोर्सची स्थापना केली आहे. आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे हे नवे अध्यक्ष असतील. विशेष म्हणजे आरोग्य क्षेत्रात देशपातळीवर संशोधन करणाऱ्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) माजी प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांना या टास्क फोर्सचे केवळ सदस्यपद देत बोळवण केली आहे. ज्या डॉ. गंगाखेडकर यांनी कोविडच्या प्रचंड लाटेत आयसीएमआरच्या माध्यमातून देशाला मार्गदर्शन केले, जे महाराष्ट्रातले आहेत, त्यांची अध्यक्षपदी निवड न करता सदस्य म्हणून त्यांना नेमले आहे. यावरून खासगी क्षेत्रातील डॉक्टरांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले आहे.

२०२० च्या एप्रिल महिन्यात कोरोनाच्या थैमानाला सुरुवात झाली. त्यावेळी राज्य सरकारने डॉ. संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमला होता. असा फोर्स नेमणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य होते. १० तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सने कोरोनाच्या कराल काळात तत्कालीन मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, वैद्यकीय शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि डॉक्टर्स यांच्यासोबत बैठका घेऊन नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. कोरोनाच्या रुग्णसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी टास्क फोर्सने मोलाची भूमिका बजावली होती. २००६-०७ साली राज्याच्या आरोग्य विभागातून माजी महासंचालक म्हणून डॉ. सुभाष साळुंखे निवृत्त झाल्यानंतर ते आरोग्य विभागाच्या कोणत्या ना कोणत्या पदावर सल्लागाराच्या भूमिकेत कायम सक्रिय आहेत. कोरोनाच्या महामारीतही ते प्रमुख सल्लागार म्हणून कार्यरत होते. 

जुन्या सदस्यांना कळवलेही नाही
नवीन टास्क फोर्स करत असताना जुन्या टास्क फोर्सच्या ज्या सदस्यांनी तीन वर्षे आपला अमूल्य वेळ या कामासाठी दिला. त्यांना नवीन टास्क फोर्स तयार करत असल्याची साधी माहिती देण्याची तसदीही आरोग्य विभागाने घेतली नाही. या अशा कारभारामुळे कोणता खासगी सेवेतील डॉक्टर सरकारी काम करण्यास पुढे येईल, असा प्रश्नही विचारला जात आहे.

 नवीन टास्क फोर्समध्ये कोण ?

अध्यक्ष : डॉ. सुभाष साळुंखे, निवृत्त आरोग्य 
महासंचालक, आरोग्य विभाग.
सदस्य : लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानीटकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ. 
डॉ. बिशन स्वरूप गर्ग, प्राध्यापक, एम जी एम एस, वर्धा.
डॉ. रमण गंगाखेडकर, माजी प्रमुख, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद
डॉ राजेश कार्यकर्ते, बी जे मेडिकल कॉलेज, पुणे.
डॉ. वर्षा पोतदार, नवले मेडिकल कॉलेज, पुणे.
डॉ. संजय झोडपे, अध्यक्ष, पब्लिक हेल्थ फौंडेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली.
डॉ. हर्षद ठाकूर, प्राध्यापक, टी आय एस एस, मुंबई.
सदस्य सचिव : डॉ. रघुनाथ भोये, अतिरिक्त संचालक, आरोग्य विभाग, पुणे.

डॉ. सुभाष साळुंखे यांनी जागतिक आरोग्य परिषदेवरही काम केले आहे. त्यांचा आणि आरोग्य विभागाचा वर्षानुवर्षे कसा काय संबंध टिकून राहू शकतो, याविषयीही आता प्रश्न उपस्थित होत आहेत. 
 

Web Title: Now a new task force on Corona, Dr. Subhash Salunkhe President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.