आता नवजात बाळाला आधार कार्ड
By admin | Published: August 20, 2015 02:03 AM2015-08-20T02:03:39+5:302015-08-20T02:03:39+5:30
जन्माला आलेल्या बाळाला रुग्णालयातच आता आधार कार्ड क्रमांक मिळणार आहे. सायन रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर राबवलेल्या प्रकल्पानंतर आता सर्व महापालिका
मुंबई : जन्माला आलेल्या बाळाला रुग्णालयातच आता आधार कार्ड क्रमांक मिळणार आहे. सायन रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर राबवलेल्या प्रकल्पानंतर आता सर्व महापालिका रुग्णालयांत ही योजना सुरू करणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिली.
आधार कार्ड योजनेची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत सुमारे ९० कोटी लोकांना आधार कार्ड देण्यात आले आहे. पण यामध्ये ५ वर्षांखालील बालकांचे प्रमाण फक्त १.३६ टक्के इतकेच आहे. लहान मुलांच्या बोटांचे ठसे स्पष्ट उमटत नाहीत या कारणामुळे लहान मुलांचे आधार कार्ड काढले जात नाही. लहान मुलांच्या आधार कार्डचा टक्का वाढावा, म्हणून रुग्णालयातच आधार कार्ड देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
३ जुलै रोजी सायन रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर आधार कार्ड योजना सुरू करण्यात आली. या वेळी २० बाळांच्या पालकांना आधार कार्ड देण्यात आल्याची माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुलेमान मर्चंट यांनी दिली.
सायन रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम यशस्वी झाल्यावर पालिकेच्या प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयात हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. पालिका या उपक्रमासाठी तयार असून यूआयडीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. त्यांनी मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यावर सर्व रुग्णालयांमध्ये बाळ
जन्माला येताच त्याला आधार क्रमांक मिळणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
आतापर्यंत ६ ते १८ वयोगटातील २१ टक्के मुलांनी आधार कार्ड काढले आहे. तर १८ वर्षांवरील व्यक्तीचे आधार कार्ड काढण्याचे प्रमाण ७७ टक्के इतके आहे. (प्रतिनिधी)