आता भाभा रुग्णालयात अतिरिक्त सुरक्षारक्षक; रुग्णालय प्रशासन अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 10:08 AM2024-05-04T10:08:05+5:302024-05-04T10:11:03+5:30
महापालिकेच्या कुर्ला येथील भाभा रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाइकाने किरकोळ कारणावरून बुधवारी रात्री परिचारिकेला मारहाण केली होती.
मुंबई : महापालिकेच्या कुर्ला येथील भाभा रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाइकाने किरकोळ कारणावरून बुधवारी रात्री परिचारिकेला मारहाण केली होती. त्याच्या निषेधार्थ परिचारिकांनी गुरुवारी काहीवेळ काम बंद आंदोलन केले.
मात्र, रुग्णाने पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांची माफी मागितल्याने हा वाद संपुष्टात आला. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने काही तातडीच्या उपाययोजना करत सुरक्षा व्यवस्था आणि प्रवेश यंत्रणा प्रभावीपणे वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
भाभा रुग्णालयात बुधवारी रात्री घडलेल्या घटनेची दखल घेऊन पालिकेच्या परिमंडळ ५ च्या उपप्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला अतिरिक्त सुरक्षारक्षक देण्याचे निर्देश दिले आहेत.
मारहाणीच्या प्रकारानंतर सतर्कता-
१) अतिरिक्त सुरक्षारक्षकांच्या नेमणुकीचा प्रस्ताव रुग्णालय प्रशासनाने पुढील कार्यवाहीसाठी दिला आहे.
२) नातेवाइकांसाठी प्रवेशिका (पास) पद्धत काटेकोरपणे अंमलात आणण्याच्या सूचना दिल्या आहेत.
३) रुग्णांचे नातेवाईक कक्षात मर्यादित वेळेतच थांबू शकणार आहेत.
४) सुरक्षारक्षकांकडूनच प्रवेशिकांची अंमलबजावणीही करण्यात येणार आहे.
५) रुग्ण आणि कर्मचारी यामधील वादाचे प्रसंग टाळणेही शक्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. एकंदरीत सतर्कता बाळगण्यात आली.