आता मुंबईतच घ्या परवडणारे घर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 02:24 AM2018-04-29T02:24:43+5:302018-04-29T02:24:43+5:30

मुंबईत आपल्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक जण त्यासाठी दिवसरात्र झटत असतात

Now affordable house in Mumbai! | आता मुंबईतच घ्या परवडणारे घर!

आता मुंबईतच घ्या परवडणारे घर!

Next

मुंबई : मुंबईत आपल्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक जण त्यासाठी दिवसरात्र झटत असतात. मात्र, घरांच्या किमती गगनाला भिडल्यामुळे बहुतांशी सर्वसामान्यांना भाड्याच्या किंवा दहा बाय दहाच्या खोलीतच आपला संसार थाटावा लागतो. म्हाडा व सिडको या संस्थांनी काहींची स्वप्ने पूर्ण केलीही. मात्र, अनेकांच्या पदरी निराशाच पडली. पण आता ही निराशा सोडा; कारण सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिका नियोजन करत आहे.
मुंबईत पुढील दोन दशकांमध्ये १० लाख परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे स्वप्न ‘विकास नियोजन आराखडा २०३४’ मधून मुंबईकरांना दाखविण्यात आले आहे. यासाठी मिठागरे व ना विकास क्षेत्राचा भूखंड खुला करण्यात येणार आहे. राष्ट्रीय गृहनिर्माण धोरणानुसार या सदनिकांची किंमत निश्चित करण्यात येणार आहे. त्यानंतर म्हाडा व सिडकोप्रमाणेच लॉटरी काढून गरजूंना या सदनिकांचे वाटप होणार आहे.
राष्ट्रीय गृहनिर्माण धोरणानुसार नागरिकांच्या सरासरी उत्पन्नाचा अंदाज घेऊन परवडणाऱ्या घराची किंमत १५ लाख रुपयांपर्यंत निश्चित होईल. तरीही वार्षिक उत्पन्नाप्रमाणे घराची अंतिम किंमत ठरविण्यात येणार आहे. ३००, ४५० आणि ६०० चौ. फुटांपर्यंतची ही घरे अल्प उत्पन्न व मध्यम उत्पन्न गटासांसाठी राखीव असणार आहेत. या १० लाख घरांसाठी २ हजार २३० हेक्टर्स भूखंड वापरण्यात येणार आहे.

पालिके च्या ६०० सूचनांना केराची टोपली
मुंबई : मुंबईच्या विकासासाठी महापालिकेने तयार केलेल्या आराखड्याला अनेक वादांनंतर तीन वर्षांनी मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, यामध्ये महापालिकेच्या नियोजन समिती व सभागृहाने सुचविलेल्या तब्बल २ हजार ७०० सूचनांपैकी ६०० बदल नाकारण्यात आले आहेत, तर काही सूचनांमध्ये मोठे बदल करून, नंतरच मंजुरी देण्यात आली आहे.
विकास नियोजन आराखड्याच्या सुधारित मसुद्याला मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी मंजुरी दिली. तत्पूर्वी विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध करून हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणीसाठी सहा सदस्यीय नियोजन समिती नेमण्यात आली. या समितीने सुनावणी घेऊन २ हजार ४०० सूचना व बदल सुचविले होते. त्यानंतर, पालिका महासभेत २६६ सूचना व बदल सुचवून त्यास मंजुरी देण्यात आली.
१ हजार ९६६ सूचनांची दखल विकास आराखड्यात घेतली आहे, तर ४४० सूचना व बदल वगळण्यात
आले आहेत. यामध्ये सभागृहाने २६६ सूचना व बदल सुचविले होते. यापैकी १०४ बदल व सूचना स्वीकारून १६२ सूचना रद्द करण्यात आल्या आहेत.
या सूचना व बदलांवरही नागरिकांकडून आता हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. यासाठी
हा आराखडा पुन्हा प्रकाशित केला जाणार आहे.

Web Title: Now affordable house in Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.