मराठीवर 'प्रभु'कृपा... आता विमानतळांवर हिंदी, इंग्रजीआधी मराठीत उद्घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 12:17 PM2018-12-27T12:17:59+5:302018-12-27T12:18:05+5:30
स्थानिक भाषांची गरज आणि माृतभाषेवरील लोकांचे प्रेम लक्षात घेऊन स्थानिक प्रवाशांवर 'प्रभू'कृपा झाली आहे.
मुंबई - देशातील सर्व विमानतळांवर प्रवाशांना माहिती देण्यासाठी केल्या जाणाऱ्या अनाऊंसमेंटमध्ये आता सर्वप्रथम स्थानिक भाषेत देण्यात येणार आहेत. नागरी विमानवाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. त्यामुळे यापुढे सर्वच राज्यांतील विमानतळांवर त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये सर्वप्रथम अनाऊंसमेंट होईल, त्यानंतर हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये सूचना देण्यात येतील.
स्थानिक भाषांची गरज आणि माृतभाषेवरील लोकांचे प्रेम लक्षात घेऊन स्थानिक प्रवाशांवर 'प्रभू'कृपा झाली आहे. त्यानुसार, विमानतळ प्राधिकरणाने आपल्या नियंत्रणातील सर्व विमानतळांना निर्देश जारी केल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल आहे. त्यामुळे देशातील 100 विमानतळांवर स्थानिक भाषेतून सर्वप्रथम उद्घोषणा करण्यात येईल. त्यानंतर, अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीत प्रवाशांना सूचना प्राप्त होईल. सरकारच्या या आदेशामुळे महाराष्ट्रीतील मुंबईसह सर्वच विमानतळांवर सर्वप्रथम मराठीत उद्घोषणा करण्यात येईल. मात्र, ज्या विमानतळावर उद्घोषणाच होत नाही, त्यांना हा नियम बंधनकारक नाही. स्थानिक भाषेतील उद्घोषणांसाठी काही संघटनांकडून सातत्याने मागणी होती होती. त्यामुळेच सरकारने 2016 साली सर्वप्रथम याबाबत परिपत्रक जारी केलं होतं.