राज ठाकरेंमुळे ६५ अन् माझ्यामुळे आणखी एक टोलनाका बंद झाला; अमित ठाकरेंची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 03:25 PM2023-07-23T15:25:55+5:302023-07-23T15:30:01+5:30
सदर घडलेल्या प्रकाराबाबत स्वत: अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे नेते आणि मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित राज ठाकरे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अमित ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. यावेळी नाशिकला असताना सिन्नर जवळ समृद्धी महामार्गावर अमित ठाकरे यांची कार टोलनाका कर्मचाऱ्यांनी अडवली. त्यानंतर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला आहे. अमित ठाकरे या महामार्गावरून गेल्यानंतर हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.
सदर घडलेल्या प्रकाराबाबत स्वत: अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला रात्री नाशिकला काम असल्यामुळे साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो. कोपरगावहून समृद्धी महामार्गावरुन नाशिककडे निघालो आणि सिन्नरजवळ असलेल्या एक्झिटच्या टोल नाक्यावर माझी गाडी थांबवली. गाडीला फास्टॅग असतानाही तो रॉड खाली आला. तो टोलनाक्याचा काहीतरी टेक्निकली प्रॉब्लेम होता. माझ्या सहकाऱ्याने ने त्यांना फास्टॅगबाबत विचारलं तर त्यांनी आमचे काही इश्यूज आहेत, असं आम्हाला सांगितल्याचं अमित ठाकरे म्हणाले.
अमित ठाकरे पुढे म्हणाले की, टोलनाक्यावरील कर्मचारी सुद्धा अत्यंत उद्धट होते. तर मॅनेजरला त्यांनी फोन केला तेव्हा तो सुद्धा तशाच भाषेत बोलत असल्याचं दिसलं. दहा मिनिटे थांबवल्यावर मला त्या ठिकाणाहून सोडण्यात आलं आणि मी नाशिकला हॉटेलवर पोहोचलो तेव्हा कळलं की टोलनाका फोडण्यात आला आहे. साहेबांमुळे (राज ठाकरेंमुळे) ६५ टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे आज अजून एक त्यामध्ये अँड झाल्याची प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी हसत-हसत दिली.
नाशिकच्या सिन्नर येथे समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्याची मनसेकडून तोडफोड @mnsadhikrut#AmitThakceraypic.twitter.com/EPRhAJU8LR
— Lokmat (@lokmat) July 23, 2023
अमित ठाकरे टोलनाक्यावरुन निघाल्यानंतर मनसे नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रागाच्या भावनेतून या टोलनाक्याची तोडफोड केली. २-३ वाहनांमधून मनसे कार्यकर्ते टोलनाक्याला दाखल झाले होते. त्यांनी टोलनाक्याच्या केबिनमधील काचा फोडल्या आणि त्याठिकाणाहून निघून गेले. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अद्याप या घटनेत कुणीही तक्रार केली नाही. परंतु पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
मनसेने उभारले होते टोलनाक्यांविरोधात आंदोलन
काही वर्षापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील टोलनाक्यांविरोधात आंदोलन उभारले होते. अनेक टोलनाक्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी स्वत: उभे राहून वाहनांची नोंदणी केली होती. मुदत संपूनही अनेक टोलनाके राज्यात सुरू असल्याचे निदर्शनास येताच राज ठाकरेंच्या आदेशाने कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर राज्य सरकारने ६५ टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राज ठाकरेंचे हे टोलनाका आंदोलन प्रचंड गाजले होते. त्यानंतर विरोधकांनी टोलनाक्याच्या माध्यमातून राज ठाकरेंनी सेटलमेंट केली असा आरोप केला. आता पुन्हा मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड सुरू केली. त्यात समृद्धी महामार्गावर टोलनाक्याची पहिल्यांदाच तोडफोड झाली आहे.