मुंबईकरांनो आता तरी जागरूक व्हा..

By Admin | Published: July 11, 2015 03:51 AM2015-07-11T03:51:23+5:302015-07-11T03:51:23+5:30

मुंबईवर भविष्यात दहशतवादी हल्ला होऊच शकत नाही, असे मानून मुंबईकर गाफीलपणे वावरत आहेत. देशभरातील सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत गंभीर बाब

Now, be aware of Mumbaiites. | मुंबईकरांनो आता तरी जागरूक व्हा..

मुंबईकरांनो आता तरी जागरूक व्हा..

googlenewsNext

टीम लोकमत , मुंबई
मुंबईवर भविष्यात दहशतवादी हल्ला होऊच शकत नाही, असे मानून मुंबईकर गाफीलपणे वावरत आहेत. देशभरातील सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत गंभीर बाब ‘लोकमत’च्या मेगा स्टिंग आॅपरेशनमधून अधोरेखित झाली. या स्टिंगने मुंबईकरांना जागरूक, सतर्क करण्यासाठी आणखी काय करायला हवे, असा विचार करण्यास पोलीस यंत्रणेला भाग पाडले. तर या स्टिंगनंतर डोळे उघडले, यापुढे जागरूक राहू, सतर्क राहू, असा विश्वास सर्वसामान्य मुंबईकरांनी ‘लोकमत’ला फोन, ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून व्यक्त केला.
‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनचे सर्वाधिक कौतुक पोलीस दलातून झाले. पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्यापासून मुंबईत नेमणुकीस असलेल्या हवालदारापर्यंत साऱ्यांनीच ‘लोकमत’ची पाठ थोपटली. आजच्या परिस्थितीत मुंबईकरांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे दयाळ यांनी सांगितले. तर मुंबई शहर दहशतवाद्यांच्या रडारवर कायम आहे, दहशतवादी हल्ल्यांची टांगती तलवार मुंबईवर कायम आहे, त्यामुळे ‘जागरूक व्हा, सतर्क राहा’ आणि दहशतवाद्यांचे भ्याड हल्ले थोपविण्यात मदत करा, ही जाणीव मुंबईकरांमध्ये रूजवण्यासाठीच्या धडपडीत ‘लोकमत’ने उडी घेतल्याने अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
शुक्रवारी स्टिंगचे वृत्त प्रसिद्ध झाले आणि वृत्तपत्रासह सोशल मीडियावरून सर्वदूर पसरले. चाकरमानी प्रवाशांचा गाफीलपणा वाचून अनेकांचे डोळे उघडले. ‘लोकमत’ने केलेले स्टिंग वाचून खरोखरच आपण किती गाफील, बेफिकीर आहोत याची जाणीव झाली. पण यापुढे मी सतर्क राहीनच
पण कुटुंबीय, नातेवाईक, सहकाऱ्यांनाही हा संदेश देईन,
खासगी बँकेत मोठ्या हुद्द्यावर काम करणाऱ्या रसिका लाड यांची ‘लोकमत’ला मिळालेली ही प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे.
जीआरपीकडून प्रतिक्रिया नाही
‘लोकमत’कडून करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशननंतर आरपीएफ आणि प्रवासी संघटनांकडून प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या. मात्र गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी असणाऱ्या जीआरपीकडून मात्र कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. जीआरपीच्या प्रवक्त्या रूपाली अंबुरे यांच्याशी संपर्क केला असता, आयुक्तांशी बोलून आपल्याशी संपर्क साधते, असे ‘लोकमत’ प्रतिनिधीला सांगितले. मात्र त्यानंतरही जीआरपीकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. लाड पुढे म्हणतात, लोकमतने जो अनुभव सर्वांसमोर मांडला तो १०० टक्के खरा आहे. अशाच प्रतिक्रिया अनेकांनी ‘लोकमत’पर्यंत पोहोचवल्या.
------------
निष्कर्ष अत्यंत धक्कादायक !
‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून जो निष्कर्ष समोर आला तो अतिशय गंभीर आहे. सहप्रवाशांना आपल्या आजूबाजूला काय घडतंय, याची जराही जाणीव नाही, हे धक्कादायक आहे. ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करू. सर्वसामान्यांचे सहकार्य लाभल्यास पोलीस आपले कर्तव्य आणखी प्रभावीपणे बजावू शकतील. दहशतवादविरोधी लढ्यात तर हे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे, याची जाणीव सर्वसामान्यांना करून देण्यासाठी आणखी जोमाने प्रयत्न करू.
- डीसीपी धनंजय कुलकर्णी, प्रवक्ता मुंबई पोलीस
---------------
मुंबईकरांचे कान टोचले
दहशतवादविरोधातला लढा हा पोलिसांपुरता मर्यादित कधीच नव्हता. यात सुरूवातीपासून लोकसहभागाला महत्त्व होते, यापुढेही राहील. पण सहभाग म्हणजे काय? तर कान, डोळे उघडे ठेवून स्वत: सतर्क राहणे, संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास ती माहिती पुरवून पोलिसांना सतर्क करणे. ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून मुंबईकरांचे कान टोचले आहेत.
- अतुलचंद्र कुलकर्णी, सहपोलीस आयुक्त (गुन्हे)
-------------
‘लोकमत’चे स्टिंग अत्यंत सूचक
पोलीस सगळीकडे पोहोचू शकत नाहीत. सर्वसामान्य जनता पोलिसांचे कान आणि डोळे आहेत. पोलिसांसोबत जर सर्वसामान्य जनताही सतर्क झाली, तर दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावता येतील. मुंबईकरांची सतर्कता तपासण्यासाठी ‘लोकमत’ने केलेले स्टिंग अत्यंत सूचक आहे, यात शंका नाही.
- राकेश मारिया, पोलीस आयुक्त, मुंबई

Web Title: Now, be aware of Mumbaiites.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.