आता रुग्णालयातही व्हा पाळीव प्राण्यांचे सोबती
By admin | Published: June 26, 2017 01:47 AM2017-06-26T01:47:25+5:302017-06-26T01:47:25+5:30
तुमच्या आजारी पाळीव प्राण्यांसह (पेट) सोबत प्राण्यांच्या रुग्णालयात राहण्याची
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तुमच्या आजारी पाळीव प्राण्यांसह (पेट) सोबत प्राण्यांच्या रुग्णालयात राहण्याची सुविधा आता उपलब्ध झाली आहे. परळच्या बाई साखराबाई दिनशॉ पेटीट रुग्णालयात यापुढे तुम्ही आपल्या आजारी प्राण्यांसोबत राहू शकण्याची सेवा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
घरात पाळलेल्या पाळीव प्राण्यांना घरातल्या सर्वांचा एवढा लळा असतो की, पालक आणि प्राणी एकमेकांशिवाय राहूच शकत नाही. काही जणांना आपल्या प्राण्यांना रुग्णालयात एकट्याला सोडून जायचे नसते. असे प्राणी पालक कधी कधी आपल्या प्राण्यांसोबत रुग्णालयात राहण्याचा हट्टही करतात. प्राणीपालकांनी केलेल्या याच मागणीमुळे बाई साखराबाई दिनशॉ पेटीट रुग्णालय प्रशासनाने प्राणीपालकांना राहण्याची व्यवस्था केली आहे. ही सुविधा लवकरच प्राणीपालकांना उपलब्ध होणार आहे.
रुग्णालयाच्या आवारातच प्राणीपालकांच्या राहण्यासाठी तीन आणि प्राण्यांसाठी स्वतंत्र चार कक्षाची बांधणी केली आहे. या रुग्णालयात पनवेल, वसई, नवी मुंबई, कल्याण या भागांतूनही पालक आपल्या आजारी प्राण्यांच्या उपचारासाठी येथे येतात. प्राण्यांच्या उपचारासाठी अनेकदा २ ते ३ दिवस लागतात. त्यामुळे आपल्या प्राण्यांसोबत आलेल्या प्राणीपालकांची मोठी गैरसोय होते. हीच गैरसोय लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने मुंबईतील एका पारसी महिलेच्या देणगीतून हे कक्ष उभारले आहे. कक्षांमध्ये वातानुकूलित सेवाही देण्यात आली आहे. या खोलीत प्राण्यासोबत पालकही एकत्र राहू शकतात. त्याशिवाय प्राण्यांसाठी आॅक्सिजन पुरवणारे यंत्रही देण्यात आले आहेत. या रुममध्ये शौचालय, वातानुकूलित सेवा देण्यात आली आहे.