आता मराठीतून व्हा डॉक्टर! विविध अभ्यासक्रम मातृभाषेत पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरुवात
By संतोष आंधळे | Published: October 28, 2022 06:10 AM2022-10-28T06:10:58+5:302022-10-28T06:58:23+5:30
विशेष म्हणजे मराठीतून वैद्यकीयचे शिक्षण घेणे बंधनकारक राहणार नाही, ते ऐच्छिक असेल.
मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रम हिंदीतून उपलब्ध करून देण्याचा मध्य प्रदेश सरकारचा निर्णय ताजा असतानाच आता महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. एमबीबीएससह आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मराठीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. २०२३ च्या शैक्षणिक वर्षांपासून हे अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होतील. विशेष म्हणजे मराठीतून वैद्यकीयचे शिक्षण घेणे बंधनकारक राहणार नाही, ते ऐच्छिक असेल.
मराठीतून वैद्यकीय अभ्यासक्रम बनविण्याची तयारी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू करण्यात आली. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील विविध तज्ज्ञांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे इंग्रजीतील पुस्तकांचे भाषांतर करताना कोणत्याही वैद्यकीय अभ्यासक्रमात फेरफार करण्यात येणार नाही. केवळ वैद्यकीय अभ्यासक्रमाची इंग्रजी पुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासाठी तीन स्तरावरील वैद्यकीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये समिती याची पाहणी आणि मांडणी करणार आहे.
राज्यात सध्याच्या घडीला एमबीबीएसचे शिक्षण देणारी ६२ महाविद्यालये आहेत. त्यात १०,०४५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये सरकार आणि महापालिकेची २७, खासगी २०, अभिमत विद्यापीठ १२ तर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील तीन वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे.
------
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाचाच एक भाग म्हणून वैद्यकीय शिक्षण स्थानिक भाषेतून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील तयारी काही महिन्यांतच पूर्ण होईल. तज्ज्ञांचा सहभाग या समितीत असून, अतिशय काटेकोरपणे हा वैद्यकीय अभ्यासक्रम बनविण्यात येणार आहे. यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत म्हणून तीन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. समितीतील सर्व सदस्य हा अभ्यासक्रम पाहूनच पुढे याला अंतिम स्वरूप देतील. एमबीबीएससह इतरही वैद्यकीय अभ्यासक्रम मराठीतून करण्यात येणार आहेत. परंतु तूर्तास एमबीबीएसला प्राधान्य देण्यात आले आहे, वैद्यकीयचे शिक्षण इंग्रजीतून घ्यावे की मराठीतून याचे पूर्ण स्वातंत्र्य विद्यार्थ्याला असेल.
- गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री
--------
हा अभ्यासक्रम मराठीतून तयार करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, तसेच आमचे विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक, अधिष्ठाता यांची मदत घेणार आहोत. त्याबरोबरच खासगी क्षेत्रांतील वैद्यकीय तज्ज्ञांची मदत या कामासाठी घेतली जात आहे. पुढच्या वर्षापासून हा अभ्यासक्रम मराठीतून असेल. यासाठी लागणाऱ्या सर्व प्रशासकीय मान्यता घेण्यात आल्या असून, काही तज्ज्ञांनी यावर काम सुरु केले आहे. येत्या काळात आणखी काही सदस्यांची समिती स्थापन करून हा अभ्यासक्रम सर्वसमावेशक कसा करता येईल याकडे लक्ष दिले जाणार आहे.
- डॉ. अश्विनी जोशी, सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग