मुंबई : महिलांना रेल्वे प्रवासाची परवानगी मिळाल्यानंतर आता बेस्ट बसेस पूर्ण क्षमतेने चालवण्यात येतील. त्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. काही बस मार्गांवर गर्दीच्या वेळेत बसगाड्यांची मागणी अधिक असते. त्यामुळे अशा सर्व मार्गांचा आढावा घेऊन बसगाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याचे नियोजन बेस्ट उपक्रमामार्फत सुरू आहे.
‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत गेल्या तीन महिन्यांमध्ये बेस्ट प्रवाशांची संख्या १८ लाखांवर पोहोचली. त्यामुळे पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती बेस्ट प्रशासनाने राज्य सरकारकडे केली होती. ही मागणी मान्य झाल्यामुळे बसगाड्यांवरील ताणही कमी होईल.
बेस्ट उपक्रमाकडे साडेतीन हजार बसगाड्यांचा ताफा आहे. बसगाड्यांवरील ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वाहतूक विकास महामंडळाच्या एक हजार गाड्या मुंबईत चालविण्यात येत आहेत. मात्र आता पूर्ण क्षमतेने बसगाड्या चालवण्यात येतील.
एका बसमध्ये ४० प्रवाशांचा बसून प्रवास- नव्या नियमानुसार, एका बसमध्ये ४० प्रवासी बसून आणि १६ प्रवाशांना उभ्याने प्रवास करता येईल.- महिला प्रवाशांसाठी जून महिन्यात विशेष तेजस्विनी बससेवा विक्रोळी ते बॅकबे या मार्गावर सुरू करण्यात आली होती. येत्या काही दिवसांत महिला प्रवाशांकडून वाढती मागणी लक्षात घेऊन बसगाड्यांची संख्या वाढवण्याचा बेस्टचा विचार सुरू आहे.- कोरोनाकाळात बेस्टच्या बसमधून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून एका सीटवर एक प्रवासी तर उभे पाच प्रवासी नेण्याची परवानगी होती. मात्र ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत कार्यालय सुरू झाल्यानंतर बसगाड्यांवरील ताण वाढून फिजिकल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले.