मुंबई - चलो ॲप मुंबईकरांच्या चांगलाच पसंतीस उतरला असल्याने बेस्ट उपक्रमाने आता २० जानेवारी पासून युनिव्हर्सल पास या ॲपवर जोडण्याचा निर्णय घेतला आहे. कोविडचा प्रसार रोखण्यासाठी दोन डोस घेतलेल्या नागरिकांना बेस्टच्या बसगाड्यांमधून प्रवास करण्याची अनुमती आहे. यावेळी बसचालक व वाहक युनिव्हर्सल पास तपासत असल्याने ॲपवरील ही सुविधा प्रवाशांना दिलासादायी ठरणार आहे.
कोविड काळातील निर्बंध शिथिल झाल्यानंतर बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधील दररोजची प्रवाशी संख्या २८ लाखांवर पोहोचली. बेस्ट आर्थिक संकटात असल्याने प्रवाशी संख्या वाढविण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी बेस्टने ७२ विविध बसमार्गांवर सुपर सेव्हर योजना आणली. चलो ॲपच्या माध्यमातून एका प्रवासाचे तिकीट किंवा मासिक पास खरेदी केल्यानंतर मोबाईलवरील त्याचा कोड स्कॅन करुन प्रवास करता येत आहे.
प्रवाशांनी तिकीट खरेदी करण्यासाठी चलो मोबाईल ॲपचा वापर केल्यानंतर तो युनिव्हर्सल पास सोबतही जोडला जाणार आहे. त्यामुळे त्याची पडताळणी तिकीट मशीनद्वारे आपोआप होत असल्याने प्रवाशांना युनिव्हर्सल पास सोबत बाळगण्याची गरज नसल्याचे बेस्ट प्रशासन स्पष्ट केले आहे. मात्र पैसे देऊन आणि स्मार्ट कार्डद्वारे तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना युनिव्हर्सल पास बस वाचकाला दाखवणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे बेस्टचे चलो मोबाईल ॲप डाउनलोड करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.