आता 'बेस्ट' ठरवेल तुम्हाला किती मदत करायची; शशांक राव यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 07:34 PM2019-01-16T19:34:47+5:302019-01-16T19:36:34+5:30
सलग नवव्या दिवशी सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर आज मिटला. संप मिटल्याची घोषणा करताना कामगार नेते शशांक राव यांनी मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
मुंबई - सलग नवव्या दिवशी सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर आज मिटला. संप मिटल्याची घोषणा करताना कामगार नेते शशांक राव यांनी मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. बेस्टला द्यायला पैसे नाहीत, बेस्टला कितीवेळा मदत करायची, अशी विचारणा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना यापुढे किती मदत करायची हे बेस्ट ठरवेल, असा इशारा शशांक राव यांनी दिला आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीस सुरुवात झाल्यावर याप्रकरणी न्यायालयानं मध्यस्थाची नेमणूक केली. तसेच तासाभरात संप मागे घेत असल्याची घोषणा करा, असे आदेश संपकऱ्यांना दिले. याला कामगार युनियनचे नेते आणि वकील यांनी मान्यता दिली. त्यानंतर कामगार नेते शशांक राव यांनी वडाळा डेपो येथे संपकऱ्यांना संबोधित करताना शशांक राव यांनी संपकऱ्यांबाबत शिवसेना नेतृत्वाकडून घेण्यात आलेल्या भूमिकेवर जोरदार टीका केली. ''उद्धव ठाकरे म्हणाले होते की बेस्ट कर्मचाऱ्यांना देण्यासाठी प्रशासनाकडे पैसे नाहीत. त्यानंतर बेस्टला कितीवेळा मदत करायची असा सवालही त्यांनी केला. मात्र आता ही बेस्ट तुम्हाला किती मदत करायची हे ठरवणार आहे." असा इशाराच शशांक राव यांनी दिला. तसेच बेस्ट कामगारांसाठी मृत्युपत्र ठरणाऱ्या खासगीकरणाच्या करारावर सह्या करण्यास सांगण्यात होते. मात्र हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला, असेही राव यांनी यावेळी सांगितले.
''कामगारांना संपवण्याचाचा डाव होता पण आम्ही लढलो. बेस्ट कामगारांच्या एकजुटीचा हा विजय आहे. गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्याचा लढा यशस्वी झाला आहे. बेस्टकडे पैस नसल्याचं उद्धव ठाकरेंनी आम्हाला म्हटलं. पण, आम्ही न्यायालयातून लढाई लढली आणि जिंकली, असेही राव यांनी यावेळी सांगितले.