Join us

मध्य वैतरणाच्या पाण्यावर अत्याधुनिक कॅमेऱ्यांचा ‘वॉच’; सुरक्षेच्या दृष्टीने पालिकेकडून निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 10:01 AM

सुरक्षा अधिक कडक होणार.

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मध्य वैतरणा हे महत्त्वाचे असून पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे विस्तारले आहे. मात्र सद्यस्थितीत मध्य वैतरणा धरणाच्या अंतर्गत सुरक्षिततेसाठी महापालिकेने बसवलेली यंत्रणा बऱ्याच वर्षांपासून कार्यरत असल्याने काही ठिकाणी नादुरुस्त झाली आहे तर काही ठिकणी जुनी असल्याने दुरुस्त करण्यापलीकडे गेली आहे. 

त्यामुळे धरणाच्या सुरक्षेसाठी अद्ययावत पद्धतीची सीसीटीव्ही सुरक्षा प्रणाली आणि त्यासंबंधी आवश्यक इतर सर्व कामे हाती घेण्याचा निर्णय जल अभियंता विभागाने घेतला आहे. मुंबई महानगराला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांतून दररोज सुमारे ३९०० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीपुरवठा होतो. 

मुख्य जलवाहिन्यांवर पुरवठ्याची  भिस्त :

विहार व तुळशी वगळता उर्वरित पाच जलाशय हे मुंबईच्या हद्दीबाहेर अर्थात नगरबाह्य विभागात मोडतात आणि तिथून सुमारे सव्वाशे ते दीडशे किलोमीटर अंतरावरुन मुंबईपर्यंत पाणी वाहून आणताना अतिशय मोठ्या आकाराच्या अशा मुख्य जलवाहिन्यांवर पुरवठ्याची मोठी भिस्त असते. यामध्ये अप्पर वैतरणा २७५० मीमी, वैतरणा २४०० मिमी, तानसा २७५० मिमी, मध्य वैतरणा ३००० मिमी, मुंबई-२ ही २३४५ मिमी, मुंबई-३ ही ३००० मिमी आणि २२३५ मिमी मुख्य जलवाहिनी यांचा समावेश आहे.

सुरक्षिततेची जबाबदारी पालिकेची :

धरणांपासून ते मुंबईपर्यंतच्या जलवाहिनी लगतच्या सुमारे १०० किमी लांबीचे सेवा रस्ते असून या सर्व सेवा रस्त्यांसह जलवाहिनीची देखभाल व दुरुस्ती ही महापालिकेच्या वतीने केली जाते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही पालिकेची असते. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून या तलावांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाते.

तीन वर्षांसाठी पुरवठा करणे बंधनकारक :

मध्य वैतरणाच्या परिसरात जवळपास १० सीसीटीव्हीचा वॉच असून त्या परिसरातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाते. मात्र कालांतराने आता ही जुनी सुरक्षा यंत्रणा व त्याच्याशी संबंधित प्रणाली बदलण्याची वेळ आली असल्याने पालिकेच्या जलअभियंता विभागाकडून यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी निवड होणाऱ्या कंत्राटदाराला सीसीटीव्ही यंत्रणेसह त्याच्याशी संबंधित सर्व सुविधेचा पुढील ३ वर्षासाठी पुरवठा करणे बंधनकारक असणार आहे.

टॅग्स :नगर पालिकापाणी