आता सर्व रेल्वे स्थानकांत बॉटल क्रशर मशिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 06:52 AM2018-06-19T06:52:08+5:302018-06-19T06:52:08+5:30
रेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिक बंदीबाबत राज्य सरकारच्या धोरणांनुसार निर्णय होईल. मुंबईसह राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू केल्यावर वॉटर वेंडिंग मशिनप्रमाणे सर्व रेल्वे स्थानकांत बॉटल क्रशर मशीन उभारण्यात येतील.
मुंबई : रेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिक बंदीबाबत राज्य सरकारच्या धोरणांनुसार निर्णय होईल. मुंबईसह राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू केल्यावर वॉटर वेंडिंग मशिनप्रमाणे सर्व रेल्वे स्थानकांत बॉटल क्रशर मशीन उभारण्यात येतील. यासाठी रेल्वे बोर्डाकडूनही प्लॅस्टिक बंदीबाबत पोषक धोरण राबविण्यात येईल, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहाणी यांनी सोमवारी रेल्वेच्या विविध प्रकल्पांच्या बैठकीत सांगितले. बैठकीत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता आणि अन्य रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
अप्रत्यक्ष ताशेरे
रेल्वे मार्गावर बाह्य घटनांनी बाधा येत असल्यामुळे लोकल विलंबाने धावतात. रेल्वे हद्दीतील साफसफाई नियमित होते, मात्र रेल्वे हद्दीबाहेरील जागेच्या साफसफाईबाबत मी सांगणे योग्य होणार नाही, असे म्हणत मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी संबंधित स्थानिक पालिकेच्या कामावर अप्रत्यक्ष ताशेरे ओढले.
लोहाणी यांनी सीएसएमटी येथे पाहणी दौऱ्यात सेल्फ तिकिटिंग झोनमधील पाच सदस्यीय अॅप प्रमोशन टीमला २५ हजार रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.