Join us  

मुंबईमध्ये आता ओलाची बससेवा

By admin | Published: June 21, 2017 11:55 AM

खासगी टॅक्सी क्षेत्रातील ओला कंपनी आता मुंबई आणि परिसरातील प्रवाशांसाठी एसी बससेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 21 - प्रवाशांना कमी किंमतीमध्ये आणि आरामदायी सेवा पुरविणाऱ्या खासगी टॅक्सी क्षेत्रातील ओला कंपनी आता मुंबई आणि परिसरातील प्रवाशांसाठी एसी बससेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. भाईंदर-पवई-भाईंदर, भाईंदर ते ठाणे, बीकेसी ते अंधेरी या मार्गांवर लवकरच ही सेवा सुरू करणार असल्याचं ओलाने त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हंटलं आहे.  पण या बस नेमक्या कधी सुरू होणार हे अजून जाहीर केलेलं नाही.  ज्या प्रमाणे टॅक्सी सर्व्हिसच्या माध्यमातून ओलाकडून सेवा दिली जाते तशीच सेवा बसच्या माध्यमातून मिळाली तर याचा सर्वसामान्य लोकांना फायदाच होइल, असं बोललं जात आहे.  
 
ओलाकडून सुरू करण्यात येणार असलेल्या शटल बस सेवेमध्ये प्रवासी आधी बुकिंग करू शकणार आहे. त्यात प्रवाशांना अॅप, रोख, ऑनलाइन स्वरूपात भाडं देण्याचा पर्याय दिला आहे. ही सेवा देताना गाड्यांचं वेळापत्रकही पुरविलं जाणार असून, त्यात जागेच्या उपलब्धतेनुसार प्रवेश दिला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ओलाने त्याच्या ब्लॉगमधून ही सविस्तर माहिती दिली आहे. सुरूवातीला या बसमध्ये सहा ते वीसपर्यंत प्रवाशांची क्षमता असेल. सकाळी साडेसात ते संध्याकाळी 7 या वेळेत बसेस चालविल्या जाणार आहेत. मुख्य म्हणजे या सेवेसाठी प्रवाशांकडून प्रतिकिमी चार रुपये दर आकारला जाणार आहे. भाईंदर ते पवई प्रवास करण्यासाठी प्रवाशाला एका सीटसाठी 59 रूपये भाडं आकारलं जाणार आहे. तर भाईदर ते बीकेसी प्रवासासाठी 75 रूपये भाडं असेल. 
वाहतुकीचे अधिकार मुंबईत बेस्ट आणि राज्यात एसटीकडे मर्यादित आहेत. त्यामुळे ओलाच्या या नवीन सेवेमुळे कोणत्याही अधिकाराचं उल्लंघन होतं आहे का , याची चाचपणी करून मगच बससेवा सुरू करायला परवानगी दिली जाईल, असं वरिष्ठ वाहतूक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 
 
या मार्गांवर सेवा मार्ग                      भाडं                वेळ भाईंदर-पवई                 59             सकाळी 7.30 भाईंदर-ठाणे                 59             सकाळी 7.20 भाईंदर-अंधेरी               49             सकाळी 7.45 भाईंदर-बीकेसी              75             सकाळी 7.30अंधेरी-बीकेसी                 49             सकाळी 8.45पवई-ठाणे                      49              सकाळी 9.00