Join us

मेट्रोचे तिकीट काढताय, व्हॉट्सअॅपवर 'हाय' करा; मेट्रो २ अ, ७ मार्गिकेवर नवी सेवा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2024 11:26 AM

या प्रणालीमुळे पेपर तिकिटांची संख्या कमी होऊन प्रवाशांना तिकिटांसाठी रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अंधेरी पश्चिम ते दहिसर मेट्रो २ अ आणि गुंदवली ते दहिसर आणि गुदवला मेट्रो ७ या मार्गिकेवर प्रवाशांच्या सोयीसाठी व्हॉट्सअॅपद्वारे ई तिकीट वितरित करण्याची प्रणाली महामुंबई मेट्रोने सुरू केली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त महिला प्रवाशांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन केले. या प्रणालीमुळे पेपर तिकिटांची संख्या कमी होऊन प्रवाशांना तिकिटांसाठी रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही.

प्रवाशांना एमएमएमओसीएलने दिलेल्या ८६५२६३५५०० या क्रमांकावर इंग्रजी अक्षरातील 'हाय' असे टाइप करून पाठवावे लागेल. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर आलेल्या सूचनांनुसार कोठून कुठे जायचे याचे ठिकाण नोंदवावे लागेल. लागेल. तसेच तिकिटांची संख्या सांगावी लागेल. त्यानुसार यूपीआय, नेटबँकिंग, क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पैसे अदा केल्यावर लिंक प्राप्त होईल. यावरील क्यूआर कोड स्कॅन करताच प्रवाशांना स्थानकात प्रवेश मिळेल.

व्हॉट्सअॅप तिकीटसेवेची वैशिष्ट्ये 

'हाय' असा इंग्रजीतील संदेश व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवून किंवा क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट खरेदी. जलद आणि सुलभ अॅक्सेसद्वारे एका व्यवहारात कमाल सहा क्यूआर तिकिटे खरेदी करता येणार. एकापेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करू शकतील. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड पेमेंटसाठी सुविधा शुल्क लागेल, यूपीआय आधारित व्यवहारांसाठी अतिरिक्त शुल्क नसेल.

मेट्रोच्या प्रवासी संख्येत दर महिन्याला ५ टक्के वाढ होत आहे. सध्या ६२ टक्के प्रवासी कागदी क्यूआर तिकिटे वापरतात. ३ टक्के प्रवासी मोबाइल क्यूआर तिकीट आणि ३५ टक्के प्रवासी एनसीएमसी कार्ड वापरतात. व्हॉट्सअॅप तिकीट सुविधेमुळे तिकीट खिडकीवरील रांगा कमी होतील. - डॉ. संजय मुखर्जी, अध्यक्ष, महामुंबई मेट्रो

 

टॅग्स :मेट्रोमुंबई