लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नियम अधिकाधिक कठोर केल्यानंतरही केबल चोरीसारखे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ‘इंटरकनेक्शन’ नियमावलीत बदल करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार, ‘कंटेंट पायरसी’ रोखण्यासाठी चौकट आखली असून, तिचे नियमन एका मान्यताप्राप्त संस्थेमार्फत केले जाईल.
केबल आणि प्रसारण क्षेत्रात होणाऱ्या अनधिकृत कारभारावर नियंत्रण आणण्यासाठी ‘ट्राय’ने २०१७ साली ‘इंटरकनेक्शन रेग्युलेशन’ची अंमलबजावणी सुरू केली. मात्र, नियम कठोर करूनही केबल चोरी, कंटेंट पायरसीसारखे प्रकार न थांबल्याने नियमावलीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, नवव्या परिशिष्टात बदल करून ‘ट्राय’ने प्रसारण आणि केबल क्षेत्रासाठी सशर्त प्रवेश प्रणाली (सीएएस) तसेच ग्राहक व्यवस्थापन प्रणालीचे (एसएमएस) तांत्रिक पालन करण्यासाठी चौकट आखून दिली.
या चौकटीचे कार्यान्वयन आणि निरीक्षण मान्यताप्राप्त संस्थेमार्फत केले जाईल. प्रमाणिकरणाचा अधिकार ‘ट्राय’कडे असेल. केबल आणि प्रसारण क्षेत्राला आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सूचीबद्ध करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल असून, ग्राहक आणि वितरकांना याचा फायदा होणार असल्याची माहिती ‘ट्राय’ने दिली.ही तांत्रिक चौकट वितरण साखळी अधिकाधिक सुरक्षित बनवेल. ‘कंटेंट पायरसी’पासून मुक्ती मिळणार असल्याने दूरचित्रवाणीच्या दर्शकांना दर्जेदार, उच्च-परिभाषेच्या साहित्याचा लाभ घेता येईल. चौर्यकर्मावर लगाम बसणार असल्यामुळे ग्राहक आणि सेवा प्रदात्यांमधील नाते अधिक दृढ होईल, अशी माहिती ‘ट्राय’ने दिली.
फायदा काय होणार?ग्राहक संख्या अचूकरित्या समजेल.चुकीच्या अहवालांमुळे हाेणारे भागधारकांचे नुकसान राेखता येईल.महसुलात वाढ होऊन गुणवत्तेत सुधारणा करण्यास वाव मिळेल.प्रसारण क्षेत्रातील गुंतवणूक वाढून शेवटच्या ग्राहकापर्यंत लाभ पोहोचविण्यास मदत होईल.