आता होणार खड्ड्यांची गणना; विरोधक आक्रमक

By admin | Published: October 6, 2016 04:51 AM2016-10-06T04:51:06+5:302016-10-06T04:51:06+5:30

आरक्षण जाहीर झाल्यानंतर लगेचच कामाला लागलेल्या विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत़

Now calculate potholes; Opponent aggressive | आता होणार खड्ड्यांची गणना; विरोधक आक्रमक

आता होणार खड्ड्यांची गणना; विरोधक आक्रमक

Next

मुंबई : आरक्षण जाहीर झाल्यानंतर लगेचच कामाला लागलेल्या विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत़ सत्ताधारी युतीचा नाकर्तेपणा दाखवून देण्यासाठी संवेदनशील मुद्द्यांना हात घालण्यास विरोधकांनी सुरुवात केली आहे़ त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे, याचाच एक भाग म्हणून आता युतीला अडचणीत आणण्यासाठी विरोधक खड्डे गणना सुरू करणार आहेत.
पावसाळ्यात दरवर्षी मुंबई खड्ड्यात जाते़ हे वर्ष यास अपवाद नाही़ मात्र या वर्षी मुसळधार पाऊस सतत कोसळत असल्याने पालिकेला खड्डे बुजविण्याचा कमी अवधी मिळाला आहे़ त्याचबरोबर खड्ड्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यातही प्रशासनाला अपयश आले आहे़ त्यात पावसाने रस्त्याची चाळण केली असताना मुंबईत ३० ते ४० खड्डेच असल्याचा दावा पालिका करत आहे़ हा मुद्दा महापालिका निवडणुकीत गाजणार आहे़ विरोधकांनी आतापासूनच सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत़ त्यानुसार विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी घाटकोपरपासून खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून संपूर्ण मुंबईतील खड्डे मोजण्याची मोहीम हाती घेतली आहे़ तर प्रशासनाने स्वत:च कुलाब्यापासून खड्ड्यांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे़ (प्रतिनिधी)

आयुक्त रस्त्यांवर
मुंबईतील रस्त्यांवर हजारो खड्डे असताना पालिकेकडे १०००-१२०० खड्ड्यांची नोंद होत आहे़ याचे तीव्र पडसाद उमटत असल्याने अखेर आयुक्त अजय मेहता यांनी स्वत: रस्त्यांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे़

तो बळी खड्ड्यामुळे नव्हे
जे़ जे़ उड्डाणपुलाखालून जाताना खड्ड्यात पडून एका तरुणाचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला होता़ त्यामुळे त्या मुलाच्या कुटुंबीयाला नुकसानभरपाई देण्याची मागणी होत होती़ मात्र त्या ठिकाणी असलेल्या एमटीएनएलच्या चेंबरमध्ये बाइक अडकून अपघात झाला़ त्यामुळे रिजवान खान या तरुणाच्या मृत्यूसाठी पालिका जबाबदार नाही, असे अतिरिक्त आयुक्त आय.ए. कुंदन यांनी स्पष्ट केले़

मनसेला स्टंटबाजी भोवणार
मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आणि नगरसेवक संतोष धुरी यांनी रस्ते विभागाचे मुख्य अभियंता संजय दराडे यांना खड्डे दाखविण्यासाठी त्यांच्या कार्यालयातून दादरला आणले़ मात्र दादर केळकर रोडवर दराडे यांच्या हातात, मी मुख्य अभियंता या खड्ड्यांना जबाबदार आहे, असा फलक देऊन उभे केले़ दराडे यांनी या दोन्ही नगरसेवकांविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे़

Web Title: Now calculate potholes; Opponent aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.