व्यावसायिक, पारंपरिक पदवी प्रवेशाचे निकष ठरविण्याच्या धोरणाकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीप्रमाणेच बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, बारावीनंतरच्या पदवी प्रवेशाचे आव्हान आता उच्च व तंत्रशिक्षण विभाग, उच्चशिक्षण विभाग, विद्यापीठ प्रशासन आणि शालेय शिक्षण विभाग यांच्यासमोर आहे. अंतर्गत मूल्यमापनाचा फॉर्म्युला अद्याप अंतिम नसल्याने या सर्व प्राधिकरणांना मिळून यावर तोडगा काढण्याची गरज आहे. बारावीनंतरच्या व्यावसायिक आणि पारंपरिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी मोजक्या विषयांची ऑनलाइन परीक्षा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, बारावीच्या संपूर्ण परीक्षा रद्द झाल्याने आता पारंपरिक आणि व्यावसायिक प्रवेशांचा तिढा कसा सोडवणार, हा प्रश्न पालक, विद्यार्थ्यांना गोंधळात टाकत असून याबद्दल पालक, शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थ्यांमध्ये मतमतांतरे आहेत.
बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या म्हणजे विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सुटले असे सध्या तरी म्हणता येणार नाही, कारण लाखो विद्यार्थी पांरपरिक अभ्यासक्रमासह वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी अशा विविध अभ्यासक्रांच्या प्रवेश परीक्षा देणार असतात. तेव्हा महाविद्यालयीन प्रवेश कसे होणार, विद्यापीठ यासंदर्भात काय निर्णय घेऊ शकतात? केवळ अंतर्गत गुणांच्या आधारे हे प्रवेश होऊ शकतात? का, की महाविद्यालयीन प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र सीईटी द्यावी लागणार का, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना सीईटी किंवा इतर प्रवेश परीक्षा द्याव्या लागणार असल्या तरी बारावीतील पीसीएम पीसीबी यातील किमान ५० टक्के गुणांची आवश्यकता अंतर्गत मूल्यमापनाद्वारे कशी साधणार, हा प्रश्न अनेक विद्यार्थी, पालकांपुढे आहे.
* बारावीनंतरच्या संधी
बारावीनंतर पारंपरिक बीए, बीएस्सी आणि बीकॉम आणि वैद्यकीय, अभियांत्रिकीशिवाय इतरही अनेक अभ्यासक्रम आहेत ज्यांना विद्यार्थी प्रवेश घेत असतात. बीएमएस, बीएफएफ, बीएमएम अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे सध्या विद्यार्थ्यांचा ओढा जास्त आहे. याचप्रमाणे मॅनेजमेंट कोर्सला जाणारे विद्यार्थी आणि मास मीडियाचा अभ्यास करणारे विद्यार्थीही आहेत. या विविध अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा घेणे हा एक पर्याय आहे.
* विद्यार्थी म्हणतात
परीक्षा रद्द झाल्या तरी आता पुढील प्रवेश कसे होणार, आम्हाला सुद्धा अकरावीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे सीईटी द्यावी लागेल का, ती कशाच्या आधारावर असेल, ऐच्छिक असेल का, ती आम्हाला ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे त्याची असेल, की ज्या विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे त्यांची असेल, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे.
प्रेरणा कळंबे, वाणिज्य शाखा, बारावी
* प्राचार्यांचे मत
पदवी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा झाली नाही तर केवळ बारावीच्या अंतर्गत गुणांच्या आधारे मेरिट प्रचंड वाढणार आहे. जिथे कट-ऑफ ७० - ८० टक्क्यांपर्यंत थांबते तिथे ते ९०- ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे स्पर्धा प्रचंड वाढेल. काही ठिकाणी प्रवेशाच्या जागा कमी आणि तुलनेने विद्यार्थी जास्त अशीही परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे प्रवेशाच्या जागांचा ही विचार करावा लागेल, असे मत उपनगरातील एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व्यक्त केले.
* पालकांना धाकधूक
परीक्षाच होणार नसल्याने फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांत चांगले गुण मिळवण्याची संधी विद्यार्थ्यांकडे नाही. अंतर्गत मूल्यमापन कोणत्या निकषांवर होणार हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांचे निकष काय असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- दिशा डहाके, पालक
परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आरोग्याची हमी मिळाली असली तरी आता पुढील प्रवेशाचे टेन्शन आहेच. अंतर्गत मूल्यमापन पद्धती अशी असावी जेणेकरून हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये आणि त्यांच्या गुणांच्या आधारावर त्यांना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा.
- रमेश चाळके, पालक
...............................................................
चौकट
जिल्ह्यातील बारावी आकडेवारी
मुले - १५१६९९
मुली - १४१०३९
तृतीयपंथी - ३०
एकूण - २९२७६८