मुंबई : मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्यासाठी वेळ न देऊ शकणाऱ्या मुंबईकरांसाठी आता खुशखबर आहे. मुंबईकरांना आता थेट रेल्वे स्थानकांवरच स्वत:चा रक्तदाब तपासता येणार आहे. लवकरच मुंबईतील दहा रेल्वे स्थानकांवर स्वयंचलित रक्तदाब तपासणी यंत्र बसविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ शुक्रवारी महिला दिनानिमित्त आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाबाचे नियंत्रण करण्याकरिता स्वयंचलित रक्तदाब तपासणी यंत्र राज्यात सातारा, सिंधुदुर्ग, वर्धा आणि भंडारा या ४ जिल्ह्यांमध्ये बसविण्यात आले आहे. व्यस्त जीवनात रक्तदाबासंदर्भात वेळीच तपासणी करणे शक्य होऊन त्यावर उपचार करणे सुलभ व्हावे यासाठी स्वयंचलित रक्तदाब यंत्र मुंबईतील दहा रेल्वेस्थानकांवर प्राथमिक टप्प्यात बसविण्यात येणार आहे. या यंत्राचे वैशिष्ट म्हणजे ते चालविण्यासाठी कुठल्याही तंत्रज्ञाची किंवा सहाय्यकाची आवश्यकता भासत नाही. ज्याला रक्तदाब तपासणी करायची आहे त्या व्यक्तीने यंत्रामध्ये हात ठेवायचा त्यानंतर त्याचा रक्तदाब मोजला जातो आणि त्याची माहिती प्रिंटद्वारे त्या व्यक्तीला समजते. त्यामुळे व्यस्त दिनक्रमातही आपल्या रक्तदाबाविषयी जागृकता निर्माण करण्यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरतील, असे आरोग्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, राज्यात शुक्रवारपासून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्करोगाची मोहीम सुरु करण्यात आली. ९ एप्रिलपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. स्त्रियांमध्ये आढळून येणाऱ्या स्तनाचा कर्करोग, गर्भाशयमुख कर्करोग, मौखिक कर्करोग याची तपासणी केली जाणार आहे.
आता रेल्वेस्थानकावर तपासा रक्तदाब
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 1:05 AM