आता कामगारांची मुलेही 'साहेब' होणार, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 06:24 AM2019-02-23T06:24:44+5:302019-02-23T06:25:22+5:30

कामगार कल्याण मंडळातर्फे प्रशिक्षण : पहिल्याच टप्प्यात १९०७ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Now the children of the laborers will also be 'saheb' and will start the competition examination training center | आता कामगारांची मुलेही 'साहेब' होणार, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू

आता कामगारांची मुलेही 'साहेब' होणार, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू

googlenewsNext

चेतन ननावरे 

मुंबई : भरमसाट फीमुळे स्पर्धा परीक्षांसाठी शिकवणी वर्ग लावणे अनेक कामगारांच्या मुलांना शक्य होत नाही. मात्र केवळ या एका कारणामुळे कामगार किंवा त्यांची मुले मागे पडू नयेत यासाठी कामगार कल्याण मंडळाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील कामगारांच्या पाल्यांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत १० विभागांत पहिल्याच टप्प्यात ४३ प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले असून १ हजार ९०७ विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.

कामगार कल्याण आयुक्त सतीश दाभाडे यांनी सांगितले की, राज्यातील कामगारांच्या पाल्यांना स्पर्धा परीक्षांना यशस्वीरीत्या सामोरे जाता यावे म्हणून मंडळाने यूपीएससी, एमपीएससी, पीएसआय/जीएसटी इन्स्पेक्टर (एसटीआय)/ एएसओ, बँक/ रेल्वे/ स्टाफ सिलेक्शन/ एमबीए एन्ट्रन्स, लिपिक टंकलेखक/ पोलीस भरती/ तलाठी भरती व इतर सरळसेवा भरती परीक्षांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. या प्रशिक्षणाअंतर्गत ४३ वर्गांमध्ये १ हजार ९०७ विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून प्रशिक्षणाचा खर्च म्हणून राज्य शासन ३ कोटी २८ लाख ११ हजार रुपये देत आहे. प्रशिक्षण वर्गांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता आता शासनाने अतिरिक्त ३ कोटी देण्यास मान्यता दिली आहे. शासनाच्या या सहकार्यामुळेच येथे कामगार तसेच कामगारांच्या मुलांना नाममात्र शुल्कात प्रशिक्षण उपलब्ध करून देणे शक्य होत आहे.
येथे स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासह अभ्यासाचे साहित्य आणि चाचणी परीक्षाही घेण्यात येतात. अभ्यासक्रमाचा कालावधी दोन ते आठ महिन्यांचा आहे. शासनाने सुरू केलेल्या मेगा भरती परीक्षेत या कामगारांच्या पाल्यांना नक्कीच यश मिळेल, असा विश्वास दाभाडे यांनी व्यक्त केला.

दहा विभागांत वर्ग सुरू
राज्यातील नागपूर, नाशिक, जळगाव, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद, ठाणे, लातूर अशा १० विभागांत मंडळाने हे प्रशिक्षण वर्ग सुरू झाले आहेत. जळगाव विभागात केवळ पीएसआय/जीएसटी इन्स्पेक्टर (एसटीआय)/ एएसओ आणि लिपिक टंकलेखक/ पोलीस भरती/ तलाठी भरती व इतर सरळसेवा भरती परीक्षा हे दोन प्रशिक्षण वर्ग सुरू असून इतर वर्ग लवकरच सुरू होणार आहेत. तर, कोल्हापूर, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यात यूपीएससी वगळता अन्य परीक्षांसाठीचे वर्ग सुरू झाले आहेत.

मुलींना ३० टक्के जागा राखीव
च्या योजनेचा लाभ महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी केलेले कामगार व त्यांचे कुटुंब घेऊ शकतील. तसेच प्रशिक्षणार्थीची निवड ही गुणवत्तेच्या आधारावर आणि चाचणीच्या माध्यमातून केली जाईल. या प्रशिक्षणात ३० टक्के जागा मुलींसाठी राखीव असतील. संबंधित ठिकाणी मुली उपलब्ध झाल्या नाहीत, तर नोंदणीकृत कामगारांच्या मुलांसाठी राखीव जागा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती मंडळाने दिली.

Web Title: Now the children of the laborers will also be 'saheb' and will start the competition examination training center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.