संदीप शिंदे मुंबई : कुलाबा ते सीप्झ अशी धावणारी मेट्रो तीन आता सीप्झमार्गे कारशेडला जाईल. त्यासाठी मेट्रो सहाच्या मार्गिकांचा वापर होईल. या मार्गिकेवरील सहा स्टेशनांवर मेट्रो तीनचे रेक प्रवासी सेवाही देतील. त्यामुळे कुलाबा ते विक्रोळी व्हाया सीप्झ अशा प्रवासाची सोय होईल.३३.५ किमी लांबीची कुलाबा ते सीप्झ ही मेट्रो मार्गिका पूर्णत: भुयारी आहे. परंतु, तिला कारशेडपर्यंतचा प्रवास उन्नत मेट्रो मार्गिकांवरून करावा लागेल.
त्यासाठी स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी या मेट्रो सहाच्या साकीविहार स्टेशनपासून सीप्झपर्यंत एक किमी लांबीची स्वतंत्र मार्गिका तयार केली जाईल. त्यावरून मेट्रो तीन ही मेट्रो सहाला जोडली जाईल. तिथून पुढे मेट्रो सहाची रामबाग, पवई लेक, आयआयटी कांजूरमार्ग आणि विक्रोळी ही स्थानके आहेत. त्या सर्व स्थानकांवरून मार्गक्रमण करत असताना मेट्रो तीन प्रवाशांची ने-आण करू शकते, अशी माहिती एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी दिली. याचा फायदा पवई, आयआयटी, विक्रोळी या भागातील रहिवाशांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मेट्रो सहाच्या ट्रेन ६ कोचच्या तर तीनच्या ट्रेन आठ कोचच्या आहेत. त्यामुळे या सहा स्टेशनवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवावी लागेल. मात्र, रुळांच्या क्षमतेत बदल करण्याची गरज नसल्याचे राजीव यांनी सांगितले. मेट्रो तीन आणि सहाचे कारशेड एकाच ठिकाणी असले तरी त्यासाठी एमएमआरडीए आणि एमएमआरसीएल स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवेल. काही सुविधा या दोन्ही मेट्रोंसाठी उपलब्ध असतील.मेट्रो तीन आणि त्यांना आवश्यक मेट्रो सहाची कामे पूर्ण झाल्यानंतर मेट्रो तीनच्या लोकार्पणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे राजीव म्हणाले. मात्र, त्यासाठी २०२४ साल उजाडण्याची चिन्हे आहेत. मेट्रो तीनच्या बदलांसाठी सुमारे ४५० कोटी तर मेट्रो सहासाठी १२५ कोटी जास्त खर्च होईल. कारशेडच्या खर्चाची वाढही स्वतंत्र असेल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.