प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता ‘कॉन्फरन्स कॉल’, रेल्वे पोलिसांची १५१२ क्रमांकाची नवी हेल्पलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 04:40 AM2017-10-03T04:40:20+5:302017-10-03T04:40:32+5:30
शहरातील ७५ लाख रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे पोलिसांतर्फे बहुप्रतीक्षित हेल्पलाइन अखेर सुरू झाली आहे. वाडीबंदर येथील रेल्वे पोलीस मुख्यालयात १५१२ या नव्या हेल्पलाइनचे उद्घाटन करण्यात आले.
मुंबई : शहरातील ७५ लाख रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे पोलिसांतर्फे बहुप्रतीक्षित हेल्पलाइन अखेर सुरू झाली आहे. वाडीबंदर येथील रेल्वे पोलीस मुख्यालयात १५१२ या नव्या हेल्पलाइनचे उद्घाटन करण्यात आले. पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्या हस्ते टोल फ्री हेल्पलाइनचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी लोहमार्ग पोलीस आयुक्त निकेत कौशिक उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी रेल्वे पोलिसांतर्फे एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
रेल्वे प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत मिळावी, यासाठी टोल फ्री हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. स्थानकांवर काही सेकंद लोकल थांबते. त्यामुळे चालत्या लोकलमध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रवाशांना तत्काळ मदत मिळत नाही. यावर उपाय म्हणून रेल्वे पोलिसांनी ‘कॉन्फरन्स कॉल’ सुविधा सुरूकेली आहे.
रेल्वे पोलिसांच्या मुख्यालयात हेल्पलाइन नियंत्रणासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहे. कक्षात सर्व उपनगरीय स्थानकांवरील आॅनड्युटी रेल्वे पोलिसांचे जीपीएस यंत्रणेद्वारे लक्ष ठेवले जाते. रेल्वे पोलीस कर्मचाºयांसाठी एक अॅप सुरू करण्यात आले आहे. या अॅपच्या माहितीवर रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाचे लक्ष असते. यामुळे आॅनड्युटी रेल्वे पोलिसांचे लोकेशन हेल्पलाइन कक्षाला मिळते.
पीडित व्यक्तीने हेल्पलाइनवर संपर्क साधल्यास, त्या व्यक्तीचा कॉल जवळच्या आॅनड्युटी कर्मचाºयाशी कॉन्फरन्सद्वारे जोडला जातो. या माध्यमातून पीडित व्यक्तीला तत्काळ मदत मिळावी, हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
रिअल टाइम प्रतिसाद देणार
रेल्वेतील प्रवाशांना ‘रिअल टाइम’मध्ये पोलिसांकडून प्रतिसाद मिळावा, यासाठी या नव्या हेल्पलाइनची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, नवीन हेल्पलाइन सुरू असताना, जुने हेल्पलाइन नंबरदेखील सुरू राहणार आहेत. प्रवाशांमध्ये नव्या हेल्पलाइनचा प्रसार होईपर्यंत काही काळ जुनी हेल्पलाइन सुरू राहील. याचबरोबर, प्रवाशांना फिडबॅक जाणून घेण्याची सुविधादेखील या हेल्पलाइन यंत्रणेत विकसित करण्यात आली आहे. - निकेत कौशिक, आयुक्त, मुंबई लोहमार्ग पोलीस