आता कॅथेटरच्या किमतीवरही नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 05:30 AM2018-03-15T05:30:44+5:302018-03-15T05:30:44+5:30
हृदयरोगावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेंटची किंमत नियंत्रित करण्यासाठी, केंद्र शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे एनपीपीए या केंद्र शासनाच्या संस्थेने, फेब्रुवारी २०१७मध्ये कार्डिअॅक स्टेंटची कमाल किंमत निर्धारित केली.
मुंबई : हृदयरोगावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेंटची किंमत नियंत्रित करण्यासाठी, केंद्र शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे एनपीपीए या केंद्र शासनाच्या संस्थेने, फेब्रुवारी २०१७मध्ये कार्डिअॅक स्टेंटची कमाल किंमत निर्धारित केली. त्यामुळे यापूर्वी लाखो रुपये किमतीच्या स्टेंटची किंमत फक्त सात ते ३० हजारांवर नियंत्रित करण्यात आली आहे. त्यानंतर, आता कॅथेटरच्या किमतीही लवकरच नियंत्रणात येणार आहेत.
अन्न व औषध प्रशासनाने या वर्षी औषधे व वैद्यकीय चिकित्सा साधनांच्या खरेदी, विक्री किमतीतील तफावतींबाबत, जसे की, अँजिओप्लास्टी या शस्त्रक्रियेकरिता वापरण्यात येणाºया बलून कॅथेटर व गाइडिंग कॅथेटरच्या किमतीबाबत अभ्यास अहवाल तयार केला होता. या अहवालातून वैद्यकीय उपकरणांचे उत्पादक ते रुग्णालये या स्तरावर मोठ्या प्रमाणावर नफेखोरी होत असल्याचे निदर्शनास आले. या उपकरणांच्या किमतीवरही नियंत्रण आणण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने एनपीपीए व डीसीजीआय यांना विनंती केली. एनपीपीएनेही उपकरणे ‘एनएलईएम २०१५’ (नॅशनल लिस्ट आॅफ एसेंन्शील मेडिसीन)च्या यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव पाठवला. तो आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, दिल्ली यांनी केंद्राच्या औषध नियंत्रकांकडे अभिप्रायार्थ पाठविल्याची माहिती एफडीएच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.