आता कोरोना उपचार केंद्रे देखील वॉटर प्रूफ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 05:36 PM2020-06-21T17:36:25+5:302020-06-21T17:36:48+5:30
धारावीतील महाराष्ट्र निसर्ग उद्यानसमोरील मोकळ्या जागेवर जी/उत्तर विभाग कार्यालयाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले २०० रुग्ण क्षमतेचे कोरोना उपचार केंद्र कार्यान्वित झाले आहे.
मुंबई : धारावीतील महाराष्ट्र निसर्ग उद्यानसमोरील मोकळ्या जागेवर जी/उत्तर विभाग कार्यालयाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले २०० रुग्ण क्षमतेचे कोरोना उपचार केंद्र कार्यान्वित झाले आहे. अंदाजे २२०० चौरस फूट क्षेत्रफळावर जलावरोधक (वॉटर प्रूफ) उभारण्यात आलेल्या या केंद्रामध्ये प्रत्येक रुग्णाच्या बेडला ऑक्सिजनचा पुरवठा आहे. मध्यम स्वरुपाची बाधा झालेल्या कोरोना बाधितांना त्याचा खासकरुन लाभ होणार आहे. प्रत्येक बेडसमवेत पंखे, प्रत्येक रुग्णाला त्यांचे वैयक्तिक साहित्य ठेवण्यासाठी कपाट तसेच स्वच्छ गादी, उशी, बेडशीट यांची काळजीपूर्वक व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक रुग्णासाठी गरम पाणी, सकाळी व सायंकाळी अल्पोपहार, दुपारी व रात्री जेवण यासह दूध आदी पोषक आहार पुरवला जातो आहे. तसेच रुग्णांची गरज लक्षात घेऊन औषधींचा पुरेसा साठादेखील उपलब्ध आहे.
धारावी परिसरातील जनतेसाठी कार्यान्वित कोरोना केंद्रामुळे दादर, माहिम, धारावीसह जी/उत्तर विभागातील जनतेला आणखी दिलासा मिळाला आहे. धारावी परिसरातील संसर्गाला रोखण्यासाठी संस्थात्मक अलगीकरण वाढवण्याच्या महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल सूचना केल्या होत्या. त्यानुसार कोरोना केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आणि अलगीकरणावर भर देण्यात आला. याचा परिणाम म्हणून धारावीतील संसर्गाला रोखण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यासोबत आता ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले व परिपूर्ण सुविधांसह सुसज्ज असे महाराष्ट्र निसर्गोद्यान कोरोना आरोग्य केंद्र कार्यान्वित झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
..............................
३ सत्र
१० डॉक्टर्स
१५ नर्स
७० वॉर्डबॉय
७० कर्मचारी
२४ तास रुग्णवाहिका
सीसीटीव्ही
थर्मल कॅमेरे
५० फ्लड लाइट
२५ स्नानगृहे
२५ प्रसाधनगृहे