मुंबई : एरवी देशी दारूच्या दुकानासमोरून जाताना नाकाला रुमाल लावणा-या विदेशी मद्यपींना आपल्या आवडीच्या विदेशी ब्रॅण्डसाठी आता देशी दुकानाची पायरी चढावी लागणार आहे. देशी दारूच्या दुकानांसमोर दारुड्यांचा हैदोस चालतो. शिवीगाळ, दारू पिऊन लोळण्याचे प्रकार तर घडतातच, शिवाय त्यातून अनेकदा हाणामा-या होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होतो.या प्रकारांना आळा घालण्यासाठी मध्यंतरी देशी दारूच्या दुकानाचे क्षेत्रफळ वाढवावे आणि त्या दुकानातच प्यायची व्यवस्था करावी, पार्किंगची सोय असावी, असा आदेश उत्पादन शुल्क विभागाने काढला होता. मात्र, त्याला काही देशी दारू दुकानदारांनी सध्या उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.आता देशी दारू दुकानांचे (सीएल ३ परवाना) रूपांतर विदेशी दारू विक्रीच्या दुकानात (एफएल २) केल्यास त्या दुकानात देशी आणि विदेशी अशा दोन्ही प्रकारच्या दारूची विक्री करता येईल, अशी परवानगी सरकारने दिली आहे. मात्र त्यासाठी दुकानदाराला काही शुल्क भरावे लागणार आहे. देशी दारूच्या दुकानांमध्ये विदेशी दारूही मिळू लागली तर देशीचा ग्राहक हळूहळू विदेशीकडे वळेल, असा उत्पादन शुल्क विभागाचा होरा आहे. त्यातून सरकारला शुल्कही अधिक मिळेल आणि देशीपासून मद्यपींना परावृत्तही करता येणार आहे. उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. देशी दारूची सध्या ४ हजार २०० दुकाने आहेत. विदेशी दारू विक्रीची १ हजार ७०० दुकाने आहेत.उत्पादन शुल्क विभागाने देशी दारूच्याच परवान्यावर विदेशी दारू विक्रीची परवानगी द्यावी व त्यासाठी वार्षिक शुल्क आकारावे. परवाना रूपांतरणाचे शुल्क आकारू नये. देशी दारू खुली विकण्याची परवानगी द्यावी आणि विदेशी दारूची विक्री ही पार्सल स्वरूपात करण्याची अनुमती द्यावी, असा तोडगा महासंघाचे अध्यक्ष लिवलन चव्हाण यांनी सुचविला.>विरोध होण्याची शक्यतादेशी दारू दुकानाचे क्षेत्रफळ वाढविण्यास विरोध झाला तसाच देशी दारू परवान्याचे विदेशी दारू परवान्यात रूपांतर करण्यास महाराष्ट्र देशी मद्य विक्रेता महासंघाकडून विरोध होण्याची शक्यता आहे. विदेशीचा परवाना घेताना सरकार जबर शुल्क आकारेल आणि ते घेतल्यानंतर आमच्यापासून देशी दारूचा परंपरागत ग्राहक दुरावल्याशिवाय राहणार नाही. परवडणाºया देशी दारू विक्रीवर संक्रांत आणण्याचा उत्पादन शुल्क विभागाचा प्रयत्न असल्याची टीका पदाधिकाºयांनी केली.
आता देशी दारूच्या दुकानातही ‘विदेशी’ मिळणार, ‘देशी’प्रेमींना ‘विदेशी’चा लळा
By यदू जोशी | Published: November 22, 2017 4:46 AM