मुंबई सेंट्रलनंतर आता सीएसएमटी ‘ईट राइट’ स्थानक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 02:28 AM2019-12-25T02:28:56+5:302019-12-25T02:29:48+5:30
भारतीय रेल्वे आणि इंडियन रेल्वे टूरिझम अॅण्ड कॅटरिंग कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) देशातील
मुंबई : अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय)द्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ‘ईट राइट’ प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांना योग्य आहार उपलब्ध करून देण्यासाठी एफएसएसएआयद्वारे ‘ईट राइट स्थानक’ अभियान सुरू केले आहे. मुंबई सेंट्रल हे पहिले ईट राइट स्थानक ठरले आहे, तर आता सीएसएमटी स्थानक ईट राइट म्हणून घोषित करण्यात आले आहे.
भारतीय रेल्वे आणि इंडियन रेल्वे टूरिझम अॅण्ड कॅटरिंग कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) देशातील स्थानके ईट राइट स्थानक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी रेल्वे स्थानकांवर आणि एक्स्प्रेसमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ आणि जेवण स्वच्छ आणि आरोग्यदायी मिळावे, यावर भर दिला जात आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे पालन, निरोगी आहाराची उपलब्धता, अन्नपदार्थ तयार करताना योग्य हाताळणी, कचरा व्यवस्थापन, ऋतुमानानुसार उपलब्ध खाद्यपदार्थ, निर्मिती आणि वाहतूक, उपलब्धता, विक्रीची ठिकाणे या निकषांवर सीएसएमटी स्थानकाची निवड करण्यात आली.
‘ईट राइट इंडिया’ अभियान ‘इट हेल्दी’ आणि ‘इट सेफ’ या दोन भागांवर उभारलेले आहे. या योजनेंतर्गत अन्न उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांमध्ये सुधारणा करण्याचा कल असतो. ग्राहकांना चांगले पदार्थ देणे, स्वच्छता राखणे, कचऱ्याचे व्यवस्थापन करणे यावर भर दिला जातो, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली
मध्य रेल्वे मार्गावरील पहिले ‘ईट राइट’ स्थानक
च्छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला मध्य रेल्वे मार्गावरील पहिल्या ‘इट राइट’ स्थानकाचा मान मिळाला आहे. तर देशातील पहिले इट राइट स्थानक म्हणून मुंबई सेंट्रल घोषित करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) द्वारे सीएसएमटीला फाइव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे.
खाद्यपदार्थांची गुणवत्ता क्यूआर कोडद्वारे
खाद्यपदार्थांचा दर्जा, खाद्यपदार्थ बनविल्याची तारीख यासंदर्भातील माहिती प्रवाशांना मिळण्यासाठी प्रत्येक खाद्यपदार्थांच्या पाकिटावर ‘क्यूआर कोड’ लावण्यात आला आहे. इंडियन रेल्वे टूरिजम अॅण्ड कॅटरिंग कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) च्या वतीने क्यूआर कोड सुविधा मुंबई सेंट्रल आणि सीएसएमटी स्थानकात सुरू केली. यामध्ये प्रवाशांना पाकीटबंद पदार्थाचा दर्जा कळण्यासाठी, पदार्थांची गुणवत्ता, खाद्यपदार्थाची किंमत कळण्यासाठी क्यूआर कोडद्वारे ‘क्वॉलिटी चेक’ करता येणार आहे.