आता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 06:10 PM2019-10-23T18:10:34+5:302019-10-23T18:11:54+5:30
मुंबईसह महाराष्ट्रात सध्यात हवामानात उल्लेखनीय बदल नोंदविण्यात येत आहेत.
मुंबई : अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून मुंबईसह महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा तडाखा बसत असतानाच आता अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतरण चक्रीवादळात होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. २५ आॅक्टोबर रोजी हे चक्रीवादळ पूर्व-उत्तरपूर्व म्हणजेच महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची चिन्हे असून, हवामानातील बदलामुळे अवकाळी पावसाच्या प्रमाणात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, २५ आॅक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्हयास ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून, गुलाबी थंडीत येणारी दिवाळी यावेळी ऐन पावसात साजरी करावी लागणार आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात सध्यात हवामानात उल्लेखनीय बदल नोंदविण्यात येत आहेत. मुंबई आणि लगतच्या परिसरात अवकाळी पाऊस कोसळत असतानाच राज्यात विशेषत: मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. सद्यस्थितीमध्ये अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आंध्रप्रदेशाच्या किनारी प्रदेशात पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शिवाय ओरिसाच्या किनारीही पाऊस कोसळेल. कर्नाटक, गोवा आणि कोकण किनारीही पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांपासूनही मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली असून, विशेषत: मंगळवारी रात्री शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या आहेत. पावसाचा हाच जोर बुधवारीही कायम राहणार असून, शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल, अशीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अतिवृष्टीचा इशारा
२४ ऑक्टोबर : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. महाराष्ट्राच्या किनारी सोसाटयाचा वारा वाहील. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडेल.
२५ ऑक्टोबर : कोकण, गोव्यात अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडेल. महाराष्ट्राच्या किनारी सोसाटयाचा वारा वाहील.
२६ ऑक्टोबर : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
तापमानात घट
विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
वादळी पाऊस
- चक्रीवादळामुळे मुंबई ठाणे आणि परिसरात मुसळधार पाऊस पडेल.
- चक्रीवादळाच्या काळात मच्छिमारांनी समुद्रात जावू नये.
- कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही भागातही जोरदार वादळी पाऊस होईल.
- राज्यात २७ आॅक्टोबरपर्यंत पाऊस पडेल.