मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट पदवी मिळणार आहे. जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून फडणवीसांना मानद डॉक्टरेट प्रदान केली जाणार असून संध्याकाळी मुंबई विद्यापीठाच्या दिक्षांत सभागृहात हा सोहळा पार पडेल. यावेळी कोयासन विद्यापीठातील प्रमुख अधिकारी उपस्थित असतील.
विद्यापीठाने १२० वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी ही पदवी त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. कोयासन विद्यापीठाचे प्रो. इन्युई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबईतील कौन्सिल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित असतील.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मानद डॉक्टर
नवी मुंबईतील डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट ही पदवी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली होती. सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी ही मानद उपाधी कुलपती डॉ. विजय पाटील यांनी प्रदान केली होती. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात केरळमधील महापूर, महालक्ष्मी एक्सप्रेस पुरात अडकल्यावर केलेले मदतकार्य, कोल्हापूर, महाड येथील पुरावेळी कार्य अशा अनेक आपत्कालीन परिस्थितीत केलेल्या कार्यासाठी शिंदे यांना गौरवण्यात आले होते. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही डॉक्टरेट जाहीर झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघांनाही मानद डॉक्टर म्हणून नवी ओळख मिळाली आहे.
संजय राऊतांची टीका
देवेंद्र फडणवीस योग्य व्यक्ती आहेत त्यांना डॉक्टरेट मिळायला हवी. पण सध्या अशाप्रकारे डॉक्टरेट देण्याची स्पर्धा लागलीय. त्यात डॉक्टर हसन मुश्रीफ होतील किंवा अन्य होतील. आम्ही त्यापदासाठी लायक नाही असा टोला राऊतांनी लगावला आहे.