Join us

यंत्राने होणार आता ‘धक धक’

By admin | Published: April 22, 2017 3:19 AM

ज्या गंभीर रुग्णांवर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे अशक्य आहे, अशा रुग्णांचे हृदयही ‘लेफ्ट व्हेन्ट्रीक्युलर असिस्ट डिव्हाइस’ या यंत्राद्वारे पुन्हा धक धक करू शकणार आहे.

मुंबई : ज्या गंभीर रुग्णांवर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे अशक्य आहे, अशा रुग्णांचे हृदयही ‘लेफ्ट व्हेन्ट्रीक्युलर असिस्ट डिव्हाइस’ या यंत्राद्वारे पुन्हा धक धक करू शकणार आहे. अशाच एका ४९ वर्षीय रुग्णाला यामुळे ‘पुनर्जन्म’ मिळाला आहे. व्यवसायाने उद्योजक असलेल्या अरविंद दोशी या ४९ वर्षीय रुग्णाला पाच वर्षांपूर्वी हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यामुळे त्यांच्या हृदयाची रक्ताभिसरणाची क्षमता संपली होती. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून ते घरातच अंथरुणाला खिळून होते. मुलुंडच्या खासगी रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञांच्या पथकाने त्यांची तपासणी केली असता त्यांना हृदय प्रत्यारोपणाची गरज असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. मात्र हृदयाला मोठ्या प्रमाणात झालेला जंतुसंसर्ग, हृदयाच्या कार्यप्रणालीतील गंभीर बिघाड, पल्मनरी ट्युबरक्युलोसिस आणि फुप्फुसांवर वाढता दबाव यामुळे शस्त्रक्रियेत धोक संभवण्याची शक्यता दिसून आली. या वेळी हे धोके ओळखून त्या रुग्णास ‘थोराचेआर्टमेट 3 - लेफ्ट व्हेन्ट्रीक्युलर असिस्ट डिव्हाइस’ यंत्र शरीरात बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. अन्वय मुळे यांनी सांगितले. त्यानंतर ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. पश्चिम व भारत क्षेत्रात प्रथमच अशा प्रकारची शस्त्रक्रिया पार पडल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेची सुरुवात पूर्वी हृदय प्रत्यारोपणासाठी ‘ब्रिज’ तयार करण्याच्या दृष्टीने झाली होती. आता मात्र अखेरच्या टप्प्यावरील हृदयविकाराचे व्यवस्थापन करण्यासाठी कायमस्वरूपी उपाय म्हणून हा पर्याय वापरला जात आहे. ज्यांना वेळेत प्रत्यारोपणयोग्य हृदय उपलब्ध होऊ शकत नाही किंवा हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेमुळे जीव धोक्यात येऊ शकतो अशा रुग्णांसाठी ही ‘डेस्टिनेशन थेरपी’ म्हणून ओळखली जात आहे. या यंत्रामुळे रुग्णाचे जीवनमान लक्षणीयरीत्या सुधारते. या शस्त्रक्रियेत डाव्या झडपेसाठीचे यंत्र बसवताना काही काळासाठी उजव्या झडपेसाठीही अशाच यंत्राचा वापर करावा लागल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)व्हेन्ट्रीक्युलर असिस्ट डिव्हाइस यंत्राचे फायदेलेफ्ट व्हेन्ट्रीक्युलर असिस्ट डिव्हाइसच्या रोपणामुळे योग्य दाता मिळेपर्यंत थांबण्याची गरज उरत नाही. हृदय प्रत्यारोपण केल्यानंतर नव्या आरोपित अवयवाचा शरीराने स्वीकार करावा यासाठी रोगप्रतिकार क्षमतेची औषधे रुग्णाला आयुष्यभर घ्यावी लागतात. या औषधांमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता मंदावते; परिणामत: जंतुसंसर्गाचा धोका वाढतो. या डिव्हाइसचे रोपण करण्यासाठी मात्र रक्ताचे वहन सुलभ होण्यासाठी रक्त पातळ करणारी औषधे तेवढी रक्तात सोडली जातात. या कृत्रिम यंत्राच्या आरोपणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे डावी झडप पुन्हा कार्यक्षम झाल्यास ते काढून टाकणेही शक्य आहे, तसेच या यंत्राकरिता रक्तगट जुळण्याची गरज नाही.लेफ्ट व्हेन्ट्रीक्युलर असिस्ट डिव्हाइसचे कार्यलेफ्ट व्हेन्ट्रीक्युलर असिस्ट डिव्हाइस हा एक यांत्रिक पंप असून कमकुवत हृदयाची रक्ताभिसरण करण्याची क्षमता वाढविण्यासाठी तो रुग्णाच्या छातीमध्ये बसविण्यात येतो. लेफ्ट व्हेन्ट्रीक्युलर असिस्ट डिव्हाइसचा वापर ‘डेस्टिनेशन थेरपी’ म्हणूनही करता येतो. याचा अर्थ ज्या गंभीर रुग्णांवर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे अशक्य आहे अशांकरिता दीर्घकालीन उपाय म्हणून ही शस्त्रक्रिया मदत करू शकतेअंथरुणाला खिळलेला रुग्ण या शस्त्रक्रियेनंतर आपल्या पायांनी घरी जाऊ शकला याचा आनंद आहे. हृदय निकामी होत असलेल्या रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया आशेचा किरण ठरणार आहे. - डॉ.एस नारायणी, क्षेत्रीय संचालकया यंत्रामुळे भावाची गंभीर स्थिती सुधारू लागली आहे. एवढ्या गंभीर परिस्थितीतून भावाला पुन्हा स्वत:च्या पायावर उभे राहिलेले पाहून खूप समाधान व आनंदाची भावना आहे. - जितेंद्र जोशी, रुग्णाचे भाऊ