Join us

आता, धनंजय मुंडे भाजपासोबत सत्तेत आले? पत्रकाराच्या प्रश्नावर पंकजाताईंचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 10:47 PM

राखी पौर्णिमेचा सण आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटी आणि राजकारण्यांपर्यंत प्रत्येतजण आपल्या बहिणींकडून राखी बांधून घेत आहे.

मुंबई - राज्याच्या राजकारणात अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे, कुटुंबातील नात्यांमध्येही या राजकीय बदलाचा परिणाम जाणवतो. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट भाजपासोबत सत्तेत सहभागी झाल्याने राजकारणात वेगळीच रंगत आली आहे. त्यातच, दोन महिने सुट्टीवर गेलेल्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे पुन्हा सक्रीय झाल्या असून शिवशक्ती परिक्रमा यात्रेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या दौऱ्यालाही सुरुवात केलीय. यावेळी, पत्रकारांनी त्यांना धनंजय मुंडेंच्या सत्तेतील राजकारणाबाबतही प्रश्न विचारला होता, त्यावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. 

राखी पौर्णिमेचा सण आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटी आणि राजकारण्यांपर्यंत प्रत्येतजण आपल्या बहिणींकडून राखी बांधून घेत आहे. राखी पौर्णिमेला मुंडे घराण्यातील बहिण-भावाची चर्चा होत असते. राजकारणात एकमेकांचे विरोधक असणारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे राखी पौर्णिमेच्या निमित्ताने एकत्र आलेले पाहायला मिळाले. 

यंदाची राखी पौर्णिमा मुंडेंसाठी खास राहिली. कारण, यंदा धनंजय मुंडे यांच्या तिन्ही बहिणींनी त्यांना राखी बांधली. मुबंईत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज आपल्या भगिनी पंकजा मुंडे यांच्यासह प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे यांच्याकडून राखी बांधून घेतली. या निमित्ताने २००९ नंतर प्रथमच कुटुंबीयांनी एकत्रित राखी पौर्णिमा साजरा केला. यावेळी प्रज्ञा मुंडेदेखील उपस्थित होत्या. तत्पूर्वी पंकजा मुंडेंनी आज नांदेडला जाऊन रेणुका मातेचं दर्शन घेतलं. 

रेणुका मातेचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांनी पंकजा मुंडेंना प्रश्नासाठी घेरलं होतं. त्यावेळी, मी शिवशक्ती परिक्रमाच्या माध्यमातून यात्रा सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, रेणुका माता हे आमचं कुलदैवत असून इथून मी यात्रेला सुरुवात केल्याचं पंकजा यांनी म्हटलं. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच बीडमध्ये धनंजय मुंडेंची सभा झाली. त्यातून त्यांनी शक्तीप्रदर्शन दाखवलं. मग, शिवशक्ती परिक्रमाच्या माध्यमातून तुम्ही शक्तीप्रदर्शन दाखवत आहात का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, मी दरवर्षी शक्तीप्रदर्शन दाखवते, वर्षातून चारवेळा दाखवते. त्याला दाखवायची गरज नाही, मी दर्शनाला आले तरी माझ्यामागे एवढीमोठी शक्ती आहे आणि शिवाचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे, कोणाशी माझी तुलना नाहीच, असे पंकजा मुंडेंनी म्हटले. 

धनंजय मुंडे भाजपासोबत सत्तेत  

धनंजय मुंडे भाजपासोबत सत्तेत आले आहेत, त्यामुळे आता स्थानिक राजकारणात काय होईल, असा सवाल विचारला असता, मी यावर योग्य वेळी बोलेन, देवाच्या स्थानी राजकारण बोलायचं नसतं, असे म्हणत पंकजा यांनी पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देणं थेट टाळलं आहे.  

टॅग्स :पंकजा मुंडेधनंजय मुंडेभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसनिवडणूक