मुंबई : केंद्र सरकारने दिलेल्या डिजिटल इंडियाच्या हाकेला सैन्य दलातील कमांडोही आता साथ देणार आहेत. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील एनएसजी हबमध्ये अथर्व फाउंडेशनच्या पुढाकाराने संगणक कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षाचा लाभ एनएसजी कमांडोंच्या कुटुंबीयांना होणार आहे.बुधवारी दुपारी १ वाजता ‘एनएसजी हब’चे प्रमुख कर्नल हेमंत साहानी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्टेट आॅफ आर्ट कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर कमांडोंच्या कुटुंबीयांना समर्पित करण्यात आले. याप्रसंगी अथर्व फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील राणे यांची विशेष उपस्थिती होती.सैन्यदलातील कुटुंबीयांना दर्जेदार संगणक प्रशिक्षण मिळावे, बदलत्या काळात त्यांनीही सर्व संगणकीय कौशल्ये प्राप्त करावीत, या उद्देशाने हे अत्याधुनिक सेंटर सुरू करण्यात आले आहे. याप्रसंगी कर्नल साहनी म्हणाले, जवानांच्या कुटुंबीयांचा समाजाशी संपर्क तुलनेने कमी येतो. चार भिंतींत ते बराच काळ राहतात. मात्र संगणकाच्या माध्यमातून जगाशी जोडले जाऊन अनेक कौशल्ये प्राप्त करता येणे शक्य आहे. या सेंटरच्या माध्यमातून ते शक्य होणार आहे. सुनील राणे यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, देशसेवा करताना जवान कुटुंबाचा फार विचार करू शकत नाहीत. मात्र या कुटुंबीयांनाही संगणकाचे शिक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे. पुढच्या काळात जवानांच्या कुटुंबीयांसाठी विशेष अॅप बनवित असल्याची माहिती या वेळी राणे यांनी दिली. सरकारकडून डिजिटल इंडियाचा लाभ या जवानांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच अथर्व फाउंडेशनने ही गरज ओळखून ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.>अथर्व फाउंडेशनच्या पुढाकाराने सुरू झालेल्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील एनएसजी हबमधील संगणक केंद्राच्या उद्घाटनानंतर संगणकांवर सराव करण्यासाठी कमांडोंच्या कुटुंबीयांमध्ये उत्साह दिसून आला. या सेंटरचा लाभ आता कमांडोंच्या मुलांनाही होणार आहे.
‘डिजिटल इंडिया’त आता जवानांचे कुटुंबीयही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 2:59 AM