मुंबई-
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी कोर्टात बाजू मांडणारे वकील गुणरत्ने सदावर्ते यांनी आज मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला संबोधित करताना खळबळजनक विधान केलं आहे. ''आता नंबर दिलीप वळसे पाटलांचा'', असं गुणरत्ने सदावर्ते म्हणाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे हे वक्तव्य करण्याआधी पत्नी आणि वकील जयश्री पाटील यांनी सदावर्ते यांच्या कानात काहीतरी सांगितलं. त्यानंतर सदावर्ते यांनी दिलीप वळसे पाटील यांचं नाव घेतलं आहे. सदावर्तेंच्या याच विधानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी अजूनही आंदोलन करत आहेत. तर गुणरत्ने सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांची बाजू न्यायालयात मांडत आहेत. आंदोलक कर्मचाऱ्यांच्या समुदायाला संबोधित करताना गुणरत्नं सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील उपस्थित होत्या. यावेळी सदावर्ते यांनी ठाकरे सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यात सदावर्तेंनी आता नंबर दिलीप वळसे पाटलांचा अशीही घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. त्यांच्या या घोषणाबाजीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काही मंत्र्यांविरोधात ईडीनं कारवाई केली आहे. यात नवाब मलिक, अनिल देशमुख यांचा समावेश आहे. तसंच शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे. तसंच अनिल परब यांच्या निकटवर्तींच्या घरी आयकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. दुसरीकडे भाजपा नेते किरीट सोमय्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर १९ बंगले असल्याच्या आरोपानं खळबळ उडवून दिली आहे. त्यात आता गुणरत्न सदावर्ते यांनी आता नंबर दिलीप वळसे पाटील यांचा असल्याचं विधान करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सदावर्तेंना यातून नेमकं काय सूचित करायचं आहे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.