आता खासगी वितरकांकडेही मिळणार दर्शनिका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 06:30 AM2019-05-06T06:30:50+5:302019-05-06T06:31:36+5:30
शासकीय ग्रंथ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत, तसेच राज्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे येणाऱ्या पिढीला आकलन व्हावे, या उद्देशाने राज्याच्या दर्शनिका विभागाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुंबई - शासकीय ग्रंथ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत, तसेच राज्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे येणाऱ्या पिढीला आकलन व्हावे, या उद्देशाने राज्याच्या दर्शनिका विभागाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेली अनेक वर्षे केवळ शासकीय वितरकांकडेच उपलब्ध होणाºया जिल्हा-राज्य दर्शनिका आता लवकरच खासगी वितरकांकडेही उपलब्ध होणार आहेत.
दर्शनिका विभाग महाराष्ट्राचे ऐतिहासिक, सांस्कृतिक वैभव टिकविण्यासाठी काम करत आहे. या दर्शनिका गेली अनेक वर्षे केवळ शासकीय वितरकांकडे उपलब्ध होत होत्या. मात्र, यामुळे त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास अडथळे निर्माण होत होते. परिणामी, वाचक आणि वितरक यांच्यातील ही दरी दूर करण्यासाठी दर्शनिका विभागाने ही सर्व गॅझेटिअर खासगी वितरकांकडे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून सामान्य वाचकांपर्यंत पोहोचणे सोपे होईल.
ई-बुक आवृत्तीही उपलब्ध
विभागामार्फत आतापर्यंत एकूण ८७ ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत. या सर्व ग्रंथांच्या ई-बुक आवृत्तीदेखील प्रकाशित करण्यात आल्या असून, ४0 हजारांपेक्षा जास्त पृष्ठे शासनाच्या संकेतस्थळावर ‘दर्शनिका’ या शीर्षकाखाली सर्वांसाठी उपलब्ध आहेत.
मात्र, १० जिल्ह्यांच्या दर्शनिकांची मराठीत निर्मिती होऊन, आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांच्या धरून एकूण १०५ दर्शनिका विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
औषधी वनस्पती, महाराष्ट्राचा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास, भूमी आणि लोक, राज्याचा इतिहास अशा कितीतरी दर्शनिका विभागाने प्रकाशित केल्या आहेत.
खासगी वितरकांनी नोंदणी करावी
गेली अनेक वर्षे दर्शनिका विभागामार्फत वेगवेगळे विषय आणि क्षेत्रांविषयी दर्शनिकांची निर्मिती करण्यात येत आहे. मात्र, हे काम काही मर्यादांमुळे सामान्यांपर्यंत पोहोचत नव्हते. ही समस्या लक्षात घेऊन खासगी वितरकांना गॅझेटिअर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खासगी वितरकांनी विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर, सर्व गॅझेटिअर्स व ई-बुक्स त्यांना उपलब्ध करून देण्यात येतील.
- दिलीप बलसेकर, कार्यकारी संपादक व सचिव, दर्शनिका विभाग.