आता दिव्यांगदेखील करू शकतील हजची यात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 05:30 AM2018-11-01T05:30:27+5:302018-11-01T05:32:20+5:30
मुस्लीम धर्मियांतील अत्यंत पवित्र व महत्त्वाच्या असलेल्या हज यात्रेला जाण्यासाठी दिव्यांगांवर असलेले बंधन आता काढून टाकण्यात आले आहे.
- खलील गिरकर
मुंबई : मुस्लीम धर्मियांतील अत्यंत पवित्र व महत्त्वाच्या असलेल्या हज यात्रेला जाण्यासाठी दिव्यांगांवर असलेले बंधन आता काढून टाकण्यात आले आहे. २०१८-१९ च्या हज यात्रेसाठी दिव्यांग व्यक्तिंनादेखील हज यात्रेला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या हज यात्रेची घोषणा काही दिवसांपूर्वीच केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी हज हाउसमधील कार्यक्रमात केली होती. यासाठी प्रसिद्ध केलेल्या अर्जामध्ये दिलेल्या माहितीत दिव्यांगांना हजची परवानगी दिल्याचा उल्लेख आहे. त्यांचा अर्ज सोडतीत पात्र ठरल्यास त्यांना हजला जाता येईल.
सध्या दिव्यांगांसाठी विशेष आरक्षण नाही. दिव्यांगांना त्यांच्यासह एकाला मदतनीस म्हणून नेण्याची मुभा आहे. त्यांचा अर्जही सोडतीसाठी पात्र ठरविल्याने त्याचे मुस्लीम समाजातून विशेषत: दिव्यांगांमधून स्वागत केले जात आहे. यंदा किती दिव्यांग सोडतीमध्ये पात्र ठरतात व त्यांंची हज यात्रा कशी होते, यावर पुढील हज यात्रेत दिव्यांगांबाबतचे धोरण अधिक स्पष्ट आखण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय हज समितीमधील सूत्रांनी दिली.
कोटा निश्चित करण्याची गरज
दिव्यांगांना हजसाठी पाठविण्यास परवानगी देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, दिव्यांगांना सर्वसाधारण कोट्यातून अर्ज करण्याऐवजी त्यांच्यासाठी काही कोटा निश्चित करण्याची गरज आहे. जेणेकरून दिव्यांगांना आरक्षण मिळून त्यांना निश्चितपणे हज यात्रेला जाता येईल.
- मोहम्मद युसूफ खान, सरचिटणीस, बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटना.