आता व्हाॅट्सॲपवर करा पर्यटनाचे मनसाेक्त प्लॅनिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 12:23 PM2024-02-08T12:23:32+5:302024-02-08T12:23:53+5:30
बुकिंगची अडचण हाेणार दूर, पर्यटनवाढीसाठी विभागाचे पाऊल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविडनंतर आता पर्यटनाकडे केवळ पर्यटन म्हणून न पाहता समृद्ध अनुभव म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन वाढला आहे. शिवाय, दुसरीकडे कृषी आणि ग्रामीण पर्यटनाकडे पर्यटकांचा अधिकाधिक ओढा आहे. त्यामुळे पर्यटनाला जाताना अनेकदा ठिकाण निवडण्यापासून ते अगदी बुकिंगपर्यंत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाने आता व्हाॅटसॲप चॅटबॉट आणि ॲप सुरू केले आहे. आता पर्यटकांना आपल्या स्मार्ट फोनवरच पर्यटनाचे प्लॅनिंग करणे सुलभ होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या कुलाबा कफपरेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे राज्य पर्यटन परिषद-२०२४ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यटनवृद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध भागधारकांनी परिषदेत सहभाग घेऊन पर्यटनवाढीला कशा पद्धतीने चालना मिळेल याविषयी विचारमंथन केले. या एकदिवसीय परिषदेत राज्याचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी या सेवेचे अनावरण केले. यावेळी पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, संचालक डॉ. बी. एन पाटील, विभागाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल इत्यादी उपस्थित होते.
लवकरच मुंबई महानगर प्रदेश पर्यटनाचे हब
राज्यातील विविध पर्यटन शाखांमध्ये देश-विदेशातील पर्यटकांनी आकर्षित व्हावे यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. याखेरीस आगामी काळात मुंबई महानगर प्रदेश हे पर्यटनाचे हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी कृती आराखडा, व्यवस्थापन आणि त्यासाठी विविध पातळ्यांवर पर्यटकांच्या वृद्धीसाठी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, ग्रामीण आणि कृषी पर्यटनावर अधिक प्रभावी काम करून पर्यटकांना अनुभव समृद्धता मिळावी यासाठी विभाग प्रयत्न करेल, अशी माहिती पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज यांनी दिली आहे.