Join us  

कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 7:21 AM

मंगळवारी व गुरूवारी सकाळी ९:३० ते ११ या वेळेत लहान मुलांच्या ओपीडी परिसरात बेहरोज मिस्त्री ही थेरपी सेवाभावी वृत्तीने देतात.

मुंबई : लहान मुलांना कॅन्सरवरील उपचार वेदनादायी होण्याऐवजी सुसह्य व्हावेत, यासाठी टाटा रुग्णालयात आता ‘डॉग थेरपी’ सुरू करण्यात आली आहे. यामुळे काही प्रमाणात मुलांच्या वेदना कमी होत असून, मुलांमध्ये उपचारांबाबत सकारात्मक दृष्टिकोन वाढीला लागल्याची माहिती समोर येत आहे.

मंगळवारी व गुरूवारी सकाळी ९:३० ते ११ या वेळेत लहान मुलांच्या ओपीडी परिसरात बेहरोज मिस्त्री ही थेरपी सेवाभावी वृत्तीने देतात. मिस्त्री या श्वानाच्या सहाय्याने विविध खेळ घेऊन मुलांना अनौपचारिक शिक्षणासह शारीरिक स्वच्छता व रुग्णालयातील उपचार याची माहिती देतात. त्यामध्ये श्वानासोबत नाचणे, त्याला खाऊ घालणे, यामध्ये मुलांना सहभागी करून घेतले जाते. 

त्यामुळे छोट्या रुग्णांना रुग्णालयातील सर्व गोष्टींचा विसर पडून उपचाराचे टेन्शन दूर होते, उपाचाराविषयी सकारात्मकता वाढते, अशी माहिती येथील डॉक्टरांनी दिली.

मुले टाळाटाळ करतात 

डॉग थेरपीसाठी निधी उभारणाऱ्या इम्पॅक्ट फाउंडेशनच्या पदाधिकारी शालिनी जटिया यांनी सांगितले, ‘दरवर्षी टाटामध्ये अंदाजे २५०० नवीन आणि ३००० जुनी रुग्ण मुले उपराचारासाठी येतात. यामध्ये ६० टक्के मुलांना ब्लड कॅन्सर, तर ४० टक्के इतर प्रकारचा कॅन्सर असतो. त्यासाठी अनेक महिने उपचार घ्यावे लागतात. मुलांना या उपचाराची मनात भीती असते. त्यामुळे उपचार घेण्यासाठी ते टाळाटाळ करत असतात.’

मी गेली अनेक वर्ष डॉग थेरपिस्ट म्हणून काम करते आहे. त्यात असे लक्षात आले आहे की, मुले श्वानासोबत समरस होऊन जातात. त्यामुळे सुरूवातीला उपचाराच्या टेन्शनने मलूल झालेली मुले अखेर आनंदाने उपराचाराला सामोरी जातात - बेहरोज मिस्त्री, डॉग थेरेपिस्ट

अमेरिकेसह प्रगत देशात डॉग थेरपी प्रसिद्ध आहे. लहान मुलांच्या उपचारात त्याचा प्रचंड फायदा होतो. भारतात अशा थेरपिस्ट आणि प्रशिक्षित श्वानांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ही थेरपी फारशी कुठे दिसत नाही. श्वानाच्या सहाय्याने शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी लहान मुलांच्या कायम लक्षात राहतात - डॉ. श्रीपाद बाणावली, संचालक,  टाटा मेमोरिअल हॉस्पिटल

टॅग्स :मुंबईकर्करोग