फेरीवाल्यांना आता दुप्पट दंड, अनधिकृत फेरीवाल्यांना आता ४० हजारांपर्यंत दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 02:33 AM2017-10-22T02:33:51+5:302017-10-22T02:33:55+5:30
एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर दिलेली मुदत संपल्याने, फेरीवाल्यांवर मनसेकडून कारवाईचे संकट आहे.
मुंबई : एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर दिलेली मुदत संपल्याने, फेरीवाल्यांवर मनसेकडून कारवाईचे संकट आहे. त्याच वेळी महापालिका प्रशासनानेही दंडाची रक्कम दुप्पट वाढवून बेकायदा फेरीवाल्यांच्या मुसक्या आवळण्याची तयारी केली आहे. त्यामुळे जप्त केलेले साहित्य सोडविण्यासाठी फेरीवाल्यांना १० ते २० हजारांऐवजी, आता २० ते ४० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईच्या वेळी, त्यांच्याकडून मालाचा प्रकार व वजनानुसार विमोचन आकार आणि दंड वसूल केला जातो. यापूर्वी असणारे दर हे १४ मार्च २०१२ च्या परिपत्रकानुसार लागू करण्यात आले होते. ज्यात आता सुमारे साडेपाच वर्षांनी प्रथमच सुधारणा करण्यात आली आहे. या प्रस्तावास आयुक्त अजय मेहता यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यानुसार, १८ आॅक्टोबर २०१७ पासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. यामुळे फेरीवाल्यांचा उपद्रव कमी होऊ शकेल, असा विश्वास अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त रणजित ढाकणे यांनी व्यक्त केला आहे.
>असा वाढेल दंड
यापूर्वी १० किलोपर्यंतच्या मालासाठी अनधिकृत फेरीवाल्यांकडून २४० रुपये विमोचन आकार वसूल केला जात होता. ही रक्कम वाढविण्यात आल्याने, आता त्यांच्याकडून ४८० रुपये वसूल केले जाणार आहेत, तसेच या व्यतिरिक्त २ हजार रुपये दंडदेखील वसूल केला जाणार आहे.
>उसाचे चरक, आइसक्रीमला ५० हजारांचा दंड
अनधिकृत उसाचे चरक, कुल्फी व आइसक्रीम हातगाडी इत्यादींकडून यापूर्वीच्या २० हजार रुपये आकाराऐवजी, आता ४० हजार रुपये वसूल केले जाणार आहेत. या व्यतिरिक्त १० हजार रुपये दंडदेखील वसूल केला जाणार आहे.
>लोखंडी स्टॉललाही दंड
अनधिकृत लोखंडी स्टॉलसाठी असणारा १० हजार रुपये विमोचन आकार आता दुप्पट म्हणजेच, २० हजार रुपये करण्यात आला आहे, तर अनधिकृत चक्रीसाठी (मेरी गो राउंड) असणारा विमोचन आकारदेखील १,२०० रुपयांवरून २,४०० रुपये एवढा करण्यात आला आहे.
>शहाळे विकणाºयांना २० रुपये दंड
अनधिकृतपणे शहाळी विकणाºयाकडून यापूर्वी प्रति शहाळे १० रुपये विमोचन आकार वसूल केला जात असे. हा विमोचन आकार आता २० रुपये करण्यात आला आहे.
>सायकलवालेही अडचणीत
दुचाकी सायकलवरून विकण्यात येणाºया वस्तू वा खाद्यपदार्थांसाठी असणारा विमोचन आकार आता १२०० रुपयांवरून २४०० रुपये करण्यात आला आहे.
>दंडाच्या रकमेत अशी वाढ
विमोचन आकाराच्या रकमेव्यतिरिक्त महापालिकेद्वारे दंडाची रक्कमही वसूल करण्यात येते. ही दंड रक्कम विमोचन आकारावर आधारित असते. या दंड रकमेतही आता दुप्पट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी ३०० रुपये विमोचन आकार असल्यास, त्यावर एक हजार रुपये दंड आकारला जात होता.
आता ही रक्कम दोन हजार रुपये करण्यात आली आहे, तर दोन हजार रुपये दंड असलेल्या जागी आता चार हजार रुपये करण्यात आले आहेत. यापूर्वीच्या चार हजारांच्या दंड रकमेतदेखील वाढ करून, आठ हजार रुपये करण्यात आली आहे.