मुंबई : मान्सून काळात मेट्रो कामामूळे मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ) पूर्णतः सज्ज आहे. मुंबई मेट्रो ३ च्या सर्व अभियंतांना तसेच कंत्राटदारांना येत्या मान्सून दरम्यान करावयाच्या उपाययोजनांबद्दल सविस्तर निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबई मेट्रो-३ च्या सर्व पॅकेजचे अधिकारी व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांसमवेत मुंबई मेट्रो ३ च्या बांधकाम स्थळांना संयुक्त भेटी दिल्या आहेत आणि मान्सूनपूर्व करावयाच्या कामांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्या आराखड्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली मुं.मे.रे.कॉच्या अभियंत्यांनी आणि कंत्राटदारांनी मान्सूनपूर्व कामाला सुरुवात केलेली असून सर्व कामे प्रगतीपथावर आहेत आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी ती पूर्ण होतील. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या स्वच्छ करणे, त्यातील गाळ काढून टाकणे तसेच कॅच पिट्स बांधणे अशी कामे प्रगतीपथावर आहेत.
याशिवाय पावसाळ्यात वाहतुकीमध्ये अडथळा येऊ नये यासाठी दिशादर्शकांची पुनः रंगरंगोटी करणे, बॅरिकेड्स स्वच्छ करून दृष्यमानता वाढवणे, कामाच्या आजूबाजुचे रस्ते सुस्थितीत ठेवणे यासारखी कामे युध्द पातळीवर चालू असून ३१ मे २०१९ पर्यंत पूर्ण होतील. याविषयी एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती अश्विनी भिडे म्हणाल्या, " मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मुंबई शहरासाठी एक महत्त्वपूर्ण वाहतूक व्यवस्था पुरवण्यासाठी कार्यरत आहे. मेट्रो ३च्या बांधकामामुळे मुंबईकरांना कोणतीही गैरसोय होणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहोत. मुंबईतील पूर प्रवण भागात सर्व प्रकारच्या आपत्कालीन उपकरणे आणि वाहने उपस्थित राहतील ज्यामुळे वाहतूक किंवा पाणी तुंबण्यासंबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाहीत.”
मेट्रो-३ च्या प्रत्येक स्थानकामध्ये पावसादरम्यान साठणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पुरेश्या प्रमाणात पंपांची (मध्यम ते मोठे क्षमता असणारे पंप 3 एचपी - 35एचपी) व्यवस्था करण्यात आलेली आहे .मान्सून दरम्यान विद्युतीय व संचार व्यवस्था कायम राखण्यासाठी मुं.मे.रे.कॉ इतर यंत्रणाशी समन्वय साधेल. बांधकाम स्थळावर जमा होणारा मलब्याचा निचरा टारपोलिनने झाकलेल्या डंपर्सद्वारे करण्यात येणार आहे.
मान्सून दरम्यान बांधकाम स्थळी साठलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. दोन अभियंते व पर्यवेक्षक असलेला आपत्कालीन प्रतिसाद चमू प्रत्येक बांधकाम स्थळावर २४ तास तैनात राहील याशिवाय बृहन्मुंबई महानगरपालिकेचे स्थानिक कार्यालय आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाशी दररोज समन्वय साधला जाईल. मान्सून संबंधी तक्रारी नोंदविण्याकरिता मुं.मे.रे.कॉच्या संकेतस्थळावर दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करण्यात येईल.