Join us

आता उत्सुकता मुंबई आयुक्तांच्या नियुक्तीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 5:13 AM

संजय बर्वे, परमबीर सिंह यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता : सुबोध जायस्वाल महिनाअखेरीस होणार डीजीपी!

- जमीर काझी 

मुंबई : निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, पोलीस दलातील बहुतांश पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने, आता सर्वांचे लक्ष मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाच्या नियुक्तीकडे लागले आहे. येत्या गुरुवारी (दि. २८) पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर निवृत्त होत असल्याने, त्यांच्या जागी मुंबईचे आयुक्त सुबोध जायस्वाल यांची नियुक्ती निश्चित मानली जाते. त्यामुळे त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल पोलीस वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) प्रमुख संजय बर्वे, अप्पर महासंचालक परमबीर सिंह यांच्यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.पोलीस महासंचालक पडसलगीकर यांना जून, २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव केंद्राने फेटाळल्याने ते २८ फेबु्रवारीला निवृत्त होतील.

सेवाज्येष्ठतेनुसार त्यांच्या जागी १९८५च्या आयपीएस बॅचचे अधिकारी व गेल्या आठ महिन्यांपासून मुंबईची धुरा सांभाळणाºया जायस्वाल यांची नियुक्ती निश्चित मानली जात आहे. त्यांच्यानंतर होमगार्डचे महासमादेशक संजय पांडे हे ज्येष्ठ अधिकारी आहेत. मात्र, कोणाचाही मुलाहिजा न बाळगता कायद्याच्या चौकटीत काम करणे, राजकीय हस्तक्षेप खपवून न घेण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे, गेली अनेक वर्षे त्यांना ‘साइड’ पोस्टिंग मिळाली आहे.

अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन गृहसचिव के. पी. बक्षी यांच्या घरी व कार्यालयात होमगार्डला ड्युटी देण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे संतप्त होऊन त्यांची सेवाज्येष्ठता दोन वर्षे नऊ महिन्यांनी कमी (डायस नॉन) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पांडे यांनी त्याला उच्च न्यायालयात आव्हान देत, पदोन्नती मिळविल्याने राज्य सरकारची त्यांच्यावर वक्रदृष्टी आहे. त्यामुळे त्यांचा विचार केला जाणार नसल्याचे सांगितले जाते. त्यांच्यानंतर एसीबीचे प्रमुख संजय बर्वे हे ज्येष्ठ अधिकारी असून, गेल्या अडीच वर्षांपासून त्यांचे नाव या पदाच्या शर्यतीत राहिले आहे. सहा महिन्यांनी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांनाच आयुक्तपद दिले जाईल, अशी शक्यता आहे. त्यांच्याशिवाय मुख्यालयातील अप्पर महासंचालक( कायदा व सुव्यवस्था) परमबीर सिंह यांचे नाव चर्चेत आहे.

सिंह हे १९८८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून, त्यांच्याशिवाय १९८७च्या बॅचचे बिपीन बिहारी (पोलीस गृहनिर्माण व कल्याण निधी), सुरेद्र पांडे ( सुधार सेवा), डी. कनकरत्नम (सुरक्षा महामंडळ) व हेमंत नागराळे ( विधि व तंत्रज्ञ) हे ज्येष्ठ आहेत. मात्र, सिंह यांच्या काम करण्याच्या धडाडीमुळे त्यांचेही नाव दोन वर्षांपासून चर्चेत आहे. त्यांची नियुक्ती करायची झाल्यास महासंचालक म्हणून बढती दिली जाईल.रश्मी शुक्ला यांच्या नावाचीही चर्चाराज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याही नावाची चर्चा आहे. मात्र, असे असले, तरी सध्या त्यांचा विचार करण्यात येणार नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :मुंबईपोलिस