Join us

आता अकरावी प्रवेशाची नव्वदीपारची स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी प्रवेश यंदा दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या निकालवरच होणार असल्याने अकरावी प्रवेशासाठीची नामांकित महाविद्यालयातील स्पर्धा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अकरावी प्रवेश यंदा दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या निकालवरच होणार असल्याने अकरावी प्रवेशासाठीची नामांकित महाविद्यालयातील स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे.

मुंबई विभागात राज्य मंडळाच्या १५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत तर ३६ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. यात आयसीएसई मंडळाचा राज्याचा दहावीचा निकालही १०० टक्के आणि सीबीएसई मंडळाचा पुणे विभागाचा निकालही ९० टक्क्यांवर लागल्याने या स्पर्धेला धार येणार आहे. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या २ ते ३ गुणवत्ता याद्यांचा कट ऑफ ९० टक्क्यांच्या खाली येणे अवघड असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून दहावीच्या निकालावरच अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी दिली. मात्र यंदाची दहावीच्या निकालाच्या उच्चांकाची आकडेवारी पाहता राज्य मंढळाच्या विद्यार्थ्यांसमोर इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांचे नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठीचे मोठे आव्हान आहे. ४५ ते ६० टक्क्यांदरम्यान राज्य मंडळाचे तब्बल ७९ हजार ५८७ विद्यार्थी आहेत. नामांकित महाविद्यालयाचे प्रवेश नव्वदीपारच पूर्ण होतील. मात्र इतर ठिकाणीही प्रवेश मिळविताना या विद्यार्थ्यांना शेवटच्या फेरीपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता काही प्राचार्य व्यक्त करीत आहेत.

राज्य मंडळाची टक्केवारीनिहाय विद्यार्थीसंख्या

९० % आणि त्याहून अधिक - १५,५४०

८५ % ते ९० % - २१,९९२

८०% ते ८५ % - ३२,२९४

७५ % ते ८० % - ४१,९९२

७० % ते ७५% - ४९,९६५

६५ % ते ७० % - ५५,०५३

६० % ते ६५ % - ५९,२६४

४५ % ते ६० % - ७९,५८७

४५ % टक्क्याहून कमी - १८,८३२

आयसीएसई दहावी निकालाची आकडेवारी

आयसीएसई - १००%

एकूण प्रविष्ट विद्यार्थी संख्या- २४,३५९

मुले- १३३१४-५४.६६%

मुली- ११,०४५- ४५. ३४%

सीबीएसई पुणे विभाग निकाल - ९९. ९२%

मुंबई विभागातील अकरावी प्रवेशाच्या मागील वर्षीच्या जागा

शाखा- एकूण प्रवेश क्षमता- केंद्रीय फेरीत निश्चित प्रवेश- कोट्यामधील प्रवेश- एकूण प्रवेश

कला - ३७३००- १७८५३- ४२६१- २२११४

वाणिज्य - १७३८८०- ९९६७९- ३०६१९- १३०२९८

विज्ञान- १०३९१०- ५३६२३- १४५४४- ६८१६७

एचएसव्हीसी - ५६६०- २७२६- ३४६- ३०७२

एकूण - ३२०७५०- १७३८८१- ४९७७०- २२३६५१

मागील वर्षी राज्यात अकरावीच्या उपलब्ध एकूण जागांपैकी सुमारे ३२ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे यंदाही अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही.

- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री