मुंबई : महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्त्याची (कोस्टल रोड) सफर आतापर्यंत आठवड्यातील पाच दिवस सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंतच मर्यादित होती. मात्र, १ मे पासून मुंबईकरांना कोस्टल रोडची सफर सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत आठवड्याचे सातही दिवस करता येणार आहे. वरळी येथील लोटस जेट्टी आणि अमरसन्स महालपासूनच्या दोन प्रवेश कोस्टल रोड प्राधिकरणाकडून खुले करण्यात आले आहेत.
दरम्यान, थडानी जंक्शनचा प्रवेश सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंतच खुला असणार आहे.
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राइव्ह, अशी दक्षिण वाहिनी १२ मार्चपासून वाहतुकीस खुली झाली. पहिल्याच दिवशी या मार्गावरून १५ हजार ८३६ वाहनांनी, तर २० दिवसांत पाच लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला. आता कोस्टल रोडचे काम ८८ टक्क्यांपर्यंत झाले आहे. दक्षिण मार्गिकेजवळील बोगद्यातील काही इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन्सची तपासणी करण्यासाठी कंत्राटदाराने वर्दळ कमी करण्यासाठी विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर मर्यादित वेळेमुळे होणारी वाहनांची गर्दी टाळण्यासाठी दोन प्रवेश मार्गांवरील वाहनांच्या ये-जा करण्याची वेळ प्राधिकरणाने वाढविली आहे. दरम्यान, कोस्टल रोडसाठी असलेले नियम आणि वेगमर्यादा बंधने कायम राहणार आहेत.