मुंबई : राज्याच्या धोरणांमध्ये विशेष मुलांसाठी तरतुदी केल्या असून, आता प्रत्येक सामान्य शाळेमध्ये विशेष शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे, असे अपंग कल्याण विभागाचे आयुक्त नितीन पाटील यांनी सांगितले. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ‘वर्ल्ड डाउन सिंड्रोम डे’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत नितीन पाटील बोलत होते. दरम्यान, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी पालकांनी व समाजाने काय केले पाहिजे, हे तंत्रशुद्ध पद्धतीने या वेळी मांडण्यात आले. मानसोपचार आणि मनोविकार यातील फरक आणि समाजामध्ये उपचाराबद्दल असलेले गैरसमज व भीती याबाबत सविस्तर माहिती या वेळी देण्यात आली. विशेष मुलांचे शीघ्र निदान आणि शीघ्र हस्तक्षेप करून योग्य तो उपचार आणि थेरेपी देणे तसेच व्यक्तिमत्त्व विकासावर लक्ष देऊन पालकांनी या मुलांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत करावी. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध कला, क्रीडा, योगा आणि नृत्य यांच्या मदतीने मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी मते या वेळी मांडण्यात आली. या वेळी डॉ. अशोक खनवटे, मानसोपचारतज्ज्ञ अंजली छाब्रिया, शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी बालसुब्रमण्यम आणि बालरोगतज्ज्ञ समीर दलवाई उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आता प्रत्येक शाळेत विशेष शिक्षक
By admin | Published: March 23, 2017 1:49 AM